अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबर्या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिर्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीच्या ठिकाणी उसळत्या पाण्याचे झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे ह्यांसहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.
यशया 35 वाचा
ऐका यशया 35
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 35:1-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ