YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 35:1-10

यशया 35:1-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील. गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिर्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीच्या ठिकाणी उसळत्या पाण्याचे झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे ह्यांसहित गवत उगवेल. तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत. तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.

सामायिक करा
यशया 35 वाचा

यशया 35:1-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल. ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील. दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा. जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील. मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील. नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील. मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल. तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही. तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील. परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु:ख आणि शोक दूर पळून जातील.

सामायिक करा
यशया 35 वाचा