YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 28

28
एफ्राइमाला इशारा
1एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.
2पाहा, प्रभूच्या हाती मजबूत व समर्थ असा कोणी आहे, तो गारांच्या वृष्टीसारखा, नासाडी करणार्‍या वादळासारखा, अतिवृष्टीने झालेल्या महापुराच्या झपाट्यासारखा सर्व बलाने तो त्यांच्या गर्वाचा मुकुट भूमीवर झुगारून देत आहे.
3एफ्राइमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायांखाली तुडवतील.
4हंगामापूर्वी आगसलेला अंजीर कोणाच्या दृष्टीस पडला म्हणजे तो हाती लागताच त्याने चटकन खाऊन टाकावा, त्याप्रमाणे सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याची गती होईल.
5त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर, आपल्या अवशिष्ट लोकांना वैभवी मुकुट, शोभिवंत किरीट असा होईल.
6न्यायासनावर बसणार्‍याला न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणार्‍या शत्रूला हटवणार्‍यांना वीरश्री असा तो होईल.
यरुशलेमेस इशारा व अभिवचन
7हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.
8सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत, निर्मळ जागाच उरली नाही.
9“तो कोणाला ज्ञान शिकवतो? कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांना काय? थानतुट्या बालकांना काय?
10कारण नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; असे तो बोलत असतो.”
11तोतर्‍यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल;
12तो त्यांना म्हणाला होता, “ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या; त्याने त्याला आराम होईल,” तरी ते ऐकतना.
13ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.
14ह्यास्तव हेटाळणी करणार्‍यांनो, यरुशलेमेतील ह्या लोकांचे अधिपतीहो, परमेश्वराचा संदेश ऐका.
15तुम्ही म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करार केला आहे, अधोलोकाबरोबर संकेत केला आहे; संकटाचा लोट येईल तेव्हा तो आमच्यावर येणार नाही, कारण आम्ही लबाडीचा आश्रय केला आहे व कपटाखाली दडून राहिलो आहोत.”
16ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’
17न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”
18मृत्यूबरोबर केलेला तुमचा करार रद्द होईल; अधोलोकाबरोबर केलेला तुमचा संकेत टिकणार नाही; संकटाचा लोट येईल तेव्हा तुमची पायमल्ली होईल.
19जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.
20कारण पाय पसरायला खाट फार आखूड आहे; पांघरायला पासोडी फार अरुद आहे.
21परमेश्वर आपले कार्य, आपले अपूर्व कार्य करण्यास, आपली कृती, आपली विलक्षण कृती सिद्धीस नेण्यास परासीम डोंगरावर उठल्याप्रमाणे उठेल, गिबोन खोर्‍यातल्याप्रमाणे क्षुब्ध होईल.
22आता हेटाळणी करू नका, नाहीतर तुमच्या बेड्या जास्त आवळतील; कारण सर्व भूमीवर निश्‍चयाने येणारा जो भयंकर नाश त्याविषयी प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून मी ऐकले आहे.
23कान देऊन माझी वाणी ऐका, लक्ष लावून माझे वचन ऐका.
24पेरण्यासाठी नांगरणारा सतत नांगरत, तास पाडत व ढेकळे फोडत राहतो काय?
25जमीन सारखी केल्यावर तिच्यात तो काळे जिरे टाकतो, जिरे विखरतो, गहू रांगेने व जव नेमल्या जागी पेरतो व कडेला काठ्या गहू पेरतो की नाही?
26हे योग्य प्रकारे करण्याचे शिक्षण त्याला मिळाले आहे; त्याचा देव त्याला शिकवतो.
27ह्यामुळे तो काळ्या जिर्‍यांची मळणी तीक्ष्ण धारेच्या यंत्राने करीत नाही व जिर्‍यावर गाडीचे चाक फिरवत नाही, तर काळे जिरे काठीने व जिरे दांड्याने झोडपतो.
28भाकरीच्या धान्याचा तो भुगा करतो काय? नाही. तो त्याची मळणी सतत चालवत नाही, तो आपल्या गाडीचे चाक व घोडे त्यावर सतत घालत नाही, तो त्याचा भुगा करत नाही.
29हेही सेनाधीश परमेश्वराकडून घडते, त्याची बुद्धी आश्‍चर्यकारक व त्याचे चातुर्य थोर आहे.

सध्या निवडलेले:

यशया 28: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन