यशया 13
13
बाबेलविषयी देववाणी
1बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :
2उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.
3मी आपल्या पवित्र केलेल्या जनांना आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरांना, अभिमानाने उल्लास पावणार्या माझ्या लोकाना मी बोलावले आहे.
4ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.
5ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत.
6आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.
7ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;
8ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.
9पाहा, रोष व तीव्र क्रोध ह्यांनी कठोर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील.
10आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही.
11मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.
12पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मीळ करीन; मानव ओफीराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मीळ करीन.
13मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.
14हुसकलेला हरिण, मेंढपाळावाचून मेंढरांचा कळप, ह्यांसारखे ते होतील; प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल; प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल.
15जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल.
16त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.
17पाहा, मी त्यांच्यावर मेदी लोक उठवीन, ते रुप्याची पर्वा करणार नाहीत व सोन्याने खूश होणार नाहीत.
18त्यांची धनुष्ये तरुणांना पाडतील; ते पोटच्या फळावर दया करणार नाहीत; त्यांचे नेत्र मुलांची कीव करणार नाहीत.
19तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.
20त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.
21तेथे वनपशू बसतील; त्यांच्या घरात घुबडे भरतील; शहामृग तेथे राहतील; बोकडाच्या रूपाची पिशाच्चे तेथे नाचतील;
22रानकुत्री त्यांच्या किल्ल्यांत, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील;तिचा काळ जवळ आला आहे; तिचे आयुर्दिन वाढवले जाणार नाहीत.
सध्या निवडलेले:
यशया 13: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.