बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी : उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील. मी आपल्या पवित्र केलेल्या जनांना आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरांना, अभिमानाने उल्लास पावणार्या माझ्या लोकाना मी बोलावले आहे. ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे. ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत. आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे; ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत. पाहा, रोष व तीव्र क्रोध ह्यांनी कठोर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील. आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन. पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मीळ करीन; मानव ओफीराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मीळ करीन. मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल. हुसकलेला हरिण, मेंढपाळावाचून मेंढरांचा कळप, ह्यांसारखे ते होतील; प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल; प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल. जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल. त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.
यशया 13 वाचा
ऐका यशया 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 13:1-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ