YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 13:1-16

यशया 13:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा. उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा. मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे. अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे. ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे. आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे. त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे; ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील. पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे. आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही. मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील. मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील. म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल. शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल. जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील.

सामायिक करा
यशया 13 वाचा

यशया 13:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी : उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील. मी आपल्या पवित्र केलेल्या जनांना आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरांना, अभिमानाने उल्लास पावणार्‍या माझ्या लोकाना मी बोलावले आहे. ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे. ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत; परमेश्वर व त्याची क्रोधशस्त्रे देशाचा विध्वंस करण्यास येत आहेत. आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे; ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत. पाहा, रोष व तीव्र क्रोध ह्यांनी कठोर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील. आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन. पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मीळ करीन; मानव ओफीराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मीळ करीन. मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल. हुसकलेला हरिण, मेंढपाळावाचून मेंढरांचा कळप, ह्यांसारखे ते होतील; प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल; प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल. जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल. त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची तान्ही बाळे ते आपटून मारतील; त्यांची घरे लुटतील; त्यांच्या स्त्रिया भ्रष्ट करतील.

सामायिक करा
यशया 13 वाचा