YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:14-32

उत्पत्ती 41:14-32 MARVBSI

मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला. फारो योसेफाला म्हणाला, “मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस?” योसेफ फारोला म्हणाला, “मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.” नंतर फारोने योसेफाला सांगितले, “पाहा, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो; तेव्हा सात धष्टपुष्ट व सुंदर गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. आणि त्यांच्यामागून दुबळ्या, अति कुरूप व रोड अशा दुसर्‍या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई सार्‍या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. ह्या दुबळ्या व कुरूप गाईंनी त्या पहिल्या सात पुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना; पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार सात कणसे एकाच ताटाला आली; आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली अशी सात कणसे निघाली; आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.” योसेफ फारोला म्हणाला, “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे; आपण काय करणार आहोत हे देवाने फारोला कळवले आहे. त्या सात चांगल्या गाई म्हणजे सात वर्षे, आणि सात चांगली कणसे म्हणजेही सात वर्षे; स्वप्न एकच आहे. मागाहून वर आलेल्या सात रोड व कुरूप गाई आणि सुकलेली व पूर्वेच्या वार्‍याने करपलेली सात कणसे ही दुष्काळाची सात वर्षे होत. मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे. पाहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत; आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार.