यहेज्केल 39
39
1हे मानवपुत्रा, गोगाविरुद्ध संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, हे गोगा, रोश, मेशेख व तुबाल ह्यांच्या अधिपती, पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे;
2मी तुला माघारी फिरवीन, तुला घेऊन जाईन, उत्तरेच्या अतिशय दूर प्रदेशातून तुला यायला लावीन. तुला इस्राएलाच्या पर्वतांकडे आणीन;
3मी तुझ्या डाव्या हातातले धनुष्य उडवून देईन; तुझ्या उजव्या हातातले बाण खाली पाडीन.
4तू इस्राएलाच्या पर्वतांवर पडशील; तू, तुझे सर्व सेनासमूह आणि तुझ्याबरोबर असलेले लोकसमूह, हे तुम्ही सगळे पडाल; मी तुम्हांला नाना प्रकारच्या हिंस्र पक्ष्यांना व वनपशूंना भक्ष म्हणून खाण्यासाठी देईन.
5उघड्या मैदानात तू पडशील, कारण मी हे बोललो आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
6मी मागोगात व द्वीपांत निर्भय राहणार्या लोकांत अग्नी पाठवीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
7मी आपल्या इस्राएल लोकांत माझे पवित्र नाम प्रकट करीन; ह्यापुढे आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे असे राष्ट्रांना समजून येईल.
8पाहा, हे प्राप्त होत आहे, घडून येत आहे; मी सांगितला तो हा दिवस आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
9तेव्हा इस्राएलच्या नगरांतले रहिवासी बाहेर निघून ढाली व कवचे, धनुष्ये व बाण, गदा व भाले इत्यादी शस्त्रांना आग लावून जाळतील; त्यांचे त्यांना सात वर्षे सरपण होईल;
10ते रानातून लाकडे आणणार नाहीत, जंगलांतले लाकूड तोडणार नाहीत; तर ही शस्त्रे ते जाळतील; त्यांना ज्यांनी लुटले त्यांना ते लुटतील व त्यांना ज्यांनी नागवले त्यांना ते नागवतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
11त्या दिवशी असे होईल की मी समुद्राच्या पूर्वतीरी असलेले प्रवाशांचे खोरे गोगास इस्राएल देशात कबरस्तान म्हणून देईन; ते येणार्याजाणार्यांची वाट अडवील; तेथे गोग व त्याचा सर्व लोकसमूह ह्यांना पुरतील, आणि त्यास हमोन-गोग (गोगाचा लोकसमुदाय) ह्याचे खोरे असे म्हणतील.
12देश शुद्ध करण्यासाठी इस्राएल घराणे त्यांना सात महिने पुरत राहील.
13देशातले सर्व लोक त्यांना पुरतील; मी आपला महिमा प्रकट करीन त्या दिवशी हे त्यांच्या कीर्तीला कारण होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
14हे काम नेहमी करणारे इसम ते वेगळे करून नेमतील आणि देश शुद्ध व्हावा म्हणून ते इसम देशभर हिंडून जमिनीवर पडून राहिलेल्या उरल्यासुरल्या लोकांना पुरतील; सात महिने लोटल्यावर ते शोधाला लागतील.
15शोध करणारे देशातून हिंडत असता कोणाला मनुष्याची अस्थी आढळली तर पुरणार्यांनी ती हमोन-गोगच्या खोर्यात नेऊन पुरावी म्हणून तेथे निशाणी करून ठेवतील.
16एका नगराचे नावही हमोना (समुदाय) असे ठेवतील; अशा प्रकारे ते देशाची शुद्धी करतील.
17प्रभू परमेश्वर म्हणतो, हे मानवपुत्रा, हरतर्हेच्या पक्ष्यांना व वनपशूंना सांग की जमा व्हा; या, मी तुमच्यासाठी यज्ञबली कापत आहे, इस्राएलाच्या पर्वतांवर महायज्ञ करत आहे; तेथे चोहोंकडून एकत्र होऊन मांस खा, रक्त प्या.
18तुम्ही वीरांचे मांस खाल, पृथ्वीचे अधिपती आणि मेंढे, कोकरे, बोकड व बैल ह्यांचे रक्त प्याल; हे सर्व बाशान डोंगरात पोसलेले आहेत.
19तुमच्यासाठी कापलेल्या माझ्या यज्ञपशूंची वपा तुम्ही तृप्ती होईपर्यंत खाल व त्यांचे रक्त पिऊन मस्त व्हाल.
20माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, वीर व सर्व प्रकारचे योद्धे ह्यांना खाऊन तुमची तृप्ती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
21तेव्हा राष्ट्रांमध्ये मी आपला महिमा स्थापीन; त्यांना शासन करीन व आपला हात त्यांच्यावर टाकीन, हे सगळी राष्ट्रे पाहतील.
22त्या दिवसापासून पुढे मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे इस्राएलाच्या घराण्यास समजेल.
23राष्ट्रांना समजेल की इस्राएल घराण्यातील लोक आपल्या दुष्टतेमुळे बंदिवासात गेले; त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला म्हणून मी त्यांच्यापासून आपले मुख लपवले आणि त्यांना त्यांच्या वैर्यांच्या हवाली केले, तेव्हा ते सर्व तलवारीने पडले.
24त्यांच्या अशुद्धतेप्रमाणे, त्यांच्या अपराधांप्रमाणे, मी त्यांच्याबरोबर वर्तलो आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवले.
25ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, आता मी याकोबाचा बंदिवास उलटवीन आणि इस्राएलाच्या अवघ्या घराण्यावर दया करीन; माझ्या पवित्र नामाची ईर्ष्या धरीन.
26ते देशात निर्भय वसतील व कोणी त्यांना धाक घालणार नाही; मग ते लज्जित होतील; माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचा त्यांना पस्तावा वाटेल.
27मी त्यांना राष्ट्रांतून परत आणीन, त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना जमा करीन व बहुत राष्ट्रांसमक्ष त्यांच्या ठायी आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा हे घडेल.
28मी त्यांना राष्ट्रांमध्ये हाकून देऊन पुन्हा मीच त्यांना त्यांच्या देशात परत आणले; त्यांच्यापैकी कोणालाही ह्यापुढे मी परदेशात राहू देणार नाही, हे पाहून मी परमेश्वर आहे असे ते समजतील;
29मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
सध्या निवडलेले:
यहेज्केल 39: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.