YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 17

17
खडकातून पाणी
(गण. 20:1-13)
1मग इस्राएल लोकांच्या सर्व समुदायाने सीन रानातून कूच केले, आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफीदीम येथे तळ दिला; तेथे त्यांना प्यायला पाणी नव्हते.
2म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, “आम्हांला प्यायला पाणी दे.” तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता?”
3पण तेथे लोकांना खूप तहान लागली आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, “आम्हांला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस?”
4मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, “ह्या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत.”
5परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांच्या पुढे जा, इस्राएलांतील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल.
6पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन; आणि तू त्या खडकावर काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल आणि लोक ते पितील.” इस्राएलाच्या वडिलांच्या देखत मोशेने तसे केले.
7मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा2 आणि मरीबा3 असे ठेवले, कारण इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. अमालेकाबरोबर युद्ध 8मग अमालेक येऊन रफीदीम येथे इस्राएल लोकांशी लढू लागला.
9तेव्हा मोशेने यहोशवाला सांगितले, “आपल्यांतले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर; उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन.”
10मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला; मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले.
11त्या वेळी असे झाले की, मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्राएलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकाची सरशी होई.
12मोशेचे हात भरून आले; तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला, आणि अहरोन आणि हूर ह्यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.
13मग यहोशवाने आपल्या तलवारीच्या धारेने4 अमालेकाचा व त्याच्या लोकांचा पाडाव केला.
14आणि परमेश्वराने मोशेला म्हटले की, “ह्याची आठवण राहावी म्हणून ही घटना एका पुस्तकात लिहून ठेव आणि यहोशवाच्या कानी घाल; कारण मी अमालेकाची आठवण पृथ्वीवरून5 अजिबात पुसून टाकीन.”
15तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव ‘याव्हे-निस्सी’ (परमेश्वर माझा झेंडा) असे ठेवले;
16आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकाशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल.”

सध्या निवडलेले:

निर्गम 17: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन