YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 18

18
इथ्रो मोशेला भेटण्यास येतो
1देवाने मोशे व आपली प्रजा इस्राएल ह्यांच्यासाठी काय काय केले, परमेश्वराने इस्राएलास मिसर देशातून कसे बाहेर आणले हे मोशेचा सासरा मिद्यानाचा याजक इथ्रो ह्याने ऐकले.
2मोशेने आपली बायको सिप्पोरा हिला पूर्वी माहेरी पाठवले होते; मोशेचा सासरा इथ्रो तिला आणि तिच्या दोघा मुलांना घेऊन आला.
3त्यांपैकी एकाचे नाव गेर्षोम होते, कारण मोशे म्हणाला होता, “मी परक्या देशात प्रवासी आहे;”
4आणि दुसर्‍याचे नाव अलियेजर होते; कारण तो म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने माझे साहाय्य करून मला फारोच्या तलवारीपासून वाचवले आहे.”
5रानात देवाच्या पर्वताजवळ मोशेने तळ दिला होता तेथे त्याचा सासरा इथ्रो त्याच्या बायकोला व मुलांना घेऊन त्याच्याकडे आला.
6आणि त्याने मोशेला सांगून पाठवले की, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी बायको व तिचे दोघे मुलगे घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
7तेव्हा मोशे आपल्या सासर्‍यास सामोरा गेला आणि त्याने त्याला नमन करून त्याचे चुंबन घेतले; त्यांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारल्यावर ते डेर्‍यात गेले.
8परमेश्वराने इस्राएलांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, वाटेने आपल्याला काय काय त्रास भोगावा लागला, आणि परमेश्वराने आपली सोडवणूक कशी केली ही सर्व हकिकत मोशेने आपल्या सासर्‍याला कळवली.
9परमेश्वराने इस्राएलांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवून त्यांचे जे कल्याण केले त्या सर्वांबद्दल इथ्रोला आनंद वाटला.
10इथ्रो म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुम्हांला मिसर्‍यांच्या हातातून व फारोच्या हातातून सोडवले, ज्याने ह्या लोकांना मिसर्‍यांच्या तावडीतून मुक्त केले, तो धन्य होय!
11आता मला कळून आले की, सर्व देवांहून परमेश्वर श्रेष्ठ आहे. ज्या बाबतीत मिसर्‍यांनी इस्राएलाशी ताठ्याने वर्तन केले त्या बाबतीतही तो श्रेष्ठ ठरला.”
12मग मोशेचा सासरा इथ्रो ह्याने देवाला होमबली अर्पण केले व यज्ञ केले; आणि अहरोन इस्राएलांच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो ह्याच्याबरोबर देवासमोर भोजन करायला आला.
न्यायनिवाडा करण्यास नायकांची नेमणूक
(अनु. 1:9-18)
13दुसर्‍या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करायला बसला; आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेभोवती उभे होते.
14मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासर्‍याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?”
15मोशे आपल्या सासर्‍याला म्हणाला, “लोक देवाला विचारायला माझ्याकडे येतात;
16त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात, तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो.”
17मोशेचा सासरा त्याला म्हणाला, “तू करीत आहेस ते काही ठीक नाही.
18तू व तुझ्याबरोबरचे लोक अशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला फार भारी आहे, तुला एकट्याला हे करवणार नाही.
19तर आता माझे ऐक; मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवासमोर तू मध्यस्थ हो, आणि ह्यांची प्रकरणे देवाकडे ने.
20विधी व नियम त्यांना शिकव. आणि त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे, कोणते काम करावे हे त्यांना दाखवत जा.
21तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;
22त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा; त्यांनी सर्व मोठी प्रकरणे तुझ्याकडे आणावीत आणि लहानसहान प्रकरणांचा त्यांनीच निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील.
23तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल, आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखाने जातील.”
24मोशेने आपल्या सासर्‍याचे ऐकून त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.
25त्याने सर्व इस्राएलांतून कर्तबगार पुरुष निवडून त्यांना प्रमुख नेमले म्हणजेच त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक नेमून ठेवले.
26ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत.
27मग मोशेने आपल्या सासर्‍याला निरोप दिला आणि तो आपल्या देशाला निघून गेला.

सध्या निवडलेले:

निर्गम 18: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन