YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 15

15
मोशेचे गीत
1तेव्हा मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी परमेश्वराला हे गीत गाईले; ते म्हणाले, “मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे; घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.
2परमेश (याह) माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे; हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; हाच माझ्या पित्याचा देव मी ह्याचा महिमा गाईन.
3परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.
4फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत; त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत.
5गहिर्‍या जलांनी त्यांना गडप केले आहे; ते दगडाप्रमाणे समुद्राच्या तळाशी गेले आहेत.
6हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.
7आपल्याविरुद्ध बंड करणार्‍यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकतोस; तू आपला संताप भडकवतोस, तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करतो.
8तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलांच्या राशी बनल्या जलप्रवाह राशीप्रमाणे उभे राहिले, गहिरे जल सागराच्या उदरी थिजून गेले.
9शत्रू म्हणाला, मी पाठलाग करीन, मी गाठीन, मी लूट वाटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल; मी तलवार उपसून आपल्या हाताने त्यांचा नाश करीन.
10तू आपल्या वार्‍याने फुंकले, तेव्हा समुद्राने त्यांना गडप केले; ते शिशाप्रमाणे महाजलाशयात बुडून गेले.
11हे परमेश्वरा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक, अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे?
12तू आपला उजवा हात उगारलास, आणि पृथ्वीने त्यांना गिळून टाकले.
13तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.
14हे ऐकून राष्ट्रे कंपायमान झाली आहेत; पलेशेथवासी भयभीत झाले आहेत.
15तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले; मवाबाचे नायक थरथरा कापत आहेत; सर्व कनानवासी गलित झाले आहेत.
16भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्‍चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल.
17तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लावशील; हेच, हे परमेश्वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच, हे प्रभू, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे.
18परमेश्वर युगानुयुग राज्य करील.”
19फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्रात गेले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्यांच्यावरून वाहवले, पण इस्राएल लोक भरसमुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले, (म्हणून त्यांनी वरील गीत गाइले).
20मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या.
21आणि मिर्यामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले, “परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहेत.”
मारा येथील कडू पाणी
22नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना.
23मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले; तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा1 असे पडले.
24तेव्हा “आम्ही काय प्यावे?” असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली.
25त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखवले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने2 त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला; त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले,
26“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.
27मग ते एलीम येथे आले, तेथे पाण्याचे बारा झरे आणि खजुरीची सत्तर झाडे होती; तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

सध्या निवडलेले:

निर्गम 15: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन