YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 30

30
पुन्हा एकत्र केले जाऊन आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अटी
1मी तुझ्यापुढे मांडलेल्या ह्या सर्व गोष्टी म्हणजे हे आशीर्वाद व शाप जेव्हा तुझ्यावर येतील, आणि तुझा देव परमेश्वर तुला ज्या ज्या राष्ट्रांमध्ये घालवून देईल तेथे तू ह्या गोष्टींचे स्मरण करशील, 2आणि जेव्हा तू आपल्या मुलाबाळांसह संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि जे काही आज मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे त्याची वाणी ऐकशील,
3तेव्हा तुझा देव परमेश्वर तुझे दास्य निवारील आणि तुझ्यावर दया करून ज्या ज्या राष्ट्रांमध्ये त्याने तुझी पांगापांग केली असेल तेथून तुला पुन्हा एकत्र आणील.
4तुझे परागंदा झालेले लोक दिगंतापर्यंत विखरले असले तरी तेथून तुझा देव परमेश्वर तुला एकत्र करून आणील;
5तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्यात तुझा देव परमेश्वर तुला आणील आणि तू त्या देशाचा वतनदार होशील; तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझे अधिक कल्याण करील आणि तुला अधिक बहुगुणित करील.
6तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील.
7पण हे सर्व शाप तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणार्‍या शत्रूंवर व द्वेष्ट्यांवर आणील.
8तू तर पुन्हा परमेश्वराची वाणी ऐकशील आणि ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या सर्व पाळशील.
9तुझा देव परमेश्वर तुझ्या कल्याणासाठी तुझ्या हातचे सर्व काम, तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांबाबतीत तुझी समृद्धी करील; परमेश्वर जसा तुझ्या पूर्वजांवर प्रसन्न होता तसा तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा प्रसन्न होईल;
10तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून ह्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या त्याच्या आज्ञा व विधी पाळले आणि आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे आपल्या संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने वळलास तर असे होईल.
11ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही.
12ती स्वर्गात नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हांला ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही.
13ती समुद्रापलीकडे नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हांला ती ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही.
14ते वचन तर तुझ्या अगदी जवळ, म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल.
15पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दुःख हे आज मी तुझ्यापुढे ठेवले आहेत;
16तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ, ही आज्ञा आज मी तुला देत आहे; म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल;
17पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस,
18तर तुझा खात्रीने नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो.
19आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील.
20आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.”

सध्या निवडलेले:

अनुवाद 30: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन