YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 29

29
मवाब देशात इस्राएल लोकांशी परमेश्वराने केलेला करार
1जो करार होरेबात परमेश्वराने इस्राएल लोकांशी केला होता त्याखेरीज जो करार मवाब देशात त्याने त्यांच्याशी करण्याची मोशेला आज्ञा दिली होती त्या कराराची वचने ही.
2मोशेने सर्व इस्राएलाला बोलावून सांगितले : “परमेश्वराने मिसर देशात तुमच्यासमक्ष फारोचे व त्याच्या सर्व सेवकांचे व त्याच्या सर्व देशाचे काय केले ते सर्व तुम्ही पाहिलेच आहे;
3म्हणजे तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेली महान संकटे, चिन्हे व मोठे चमत्कार;
4पण आजपर्यंत परमेश्वराने तुम्हांला समजायला मन, पाहायला डोळे व ऐकायला कान दिले नाहीत.
5मी तुम्हांला चाळीस वर्षे रानातून चालवले, पण तुमच्या अंगावरचे कपडे विरले नाहीत किंवा तुमच्या पायांतील पायतणे झिजली नाहीत.
6मी परमेश्वर तुमचा देव आहे हे तुम्हांला कळावे म्हणून तुम्हांला खाण्यासाठी भाकर मिळाली नाही आणि पिण्यासाठी द्राक्षारस किंवा मद्य मिळाले नाही.
7तुम्ही ह्या स्थानी आल्यावर हेशबोनाचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग आपणांबरोबर सामना करण्यास समोर आले, तेव्हा आपण त्यांचा मोड केला;
8आणि त्यांचा देश घेऊन रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला.
9तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हांला यश मिळावे म्हणून ह्या कराराची वचने काळजीपूर्वक पाळा.
10तुम्ही सगळे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आज उभे आहात; तुमचे प्रमुख, तुमचे वंश, तुमचे वडील जन आणि तुमचे अंमलदार व सर्व इस्राएल लोक,
11तुमची मुलेबाळे, तुमच्या स्त्रिया व लाकूडतोड्यापासून पाणक्यापर्यंत तुमच्या छावणीतले सर्व उपरे आज ह्यासाठी उभे आहेत की,
12जो करार तुमचा देव परमेश्वर आज तुमच्याशी करीत आहे व जे वचन शपथपूर्वक तुम्हांला देत आहे त्यात तुम्ही सामील व्हावे;
13आणि त्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे व तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना दिलेल्या शपथेनुसार तुम्हांला आपली प्रजा ठरवावे आणि त्याने तुमचा देव व्हावे.
14हा करार व ही आणभाक मी केवळ तुमच्याशीच करतो असे नाही,
15तर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर जो आज येथे उभा आहे आणि जो येथे हजर नाही त्याच्याशीही करतो.
16आपण मिसर देशात कसे राहत होतो व निरनिराळ्या राष्ट्रांमधून प्रवास करीत आपण कसे आलो हे तुम्हांला ठाऊकच आहे;
17त्यांच्या काष्ठपाषाणाच्या व सोन्यारुप्याच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या;
18आज आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून परावृत्त होऊन त्या राष्ट्रांच्या देवांची सेवा करायला आपले मन प्रवृत्त करील असा एखादा पुरुष, स्त्री, कूळ किंवा वंश तुमच्या लोकांत कदाचित असायचा! कोण जाणे! विष व कडूदवणा येणारे मूळ तुमच्यामध्ये असेल!
19‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.
20परमेश्वर त्याला मुळीच क्षमा करणार नाही; पण त्याचा कोप व त्याची ईर्ष्या असल्या मनुष्यावर पेटेल, व ह्या ग्रंथात लिहिलेले सर्व शाप त्याला लागतील, आणि परमेश्वर भूतलावरून त्याचे नाव खोडून टाकील.
21नियमशास्त्राच्या ह्या ग्रंथात जो करार लिहिलेला आहे त्यातल्या सर्व शापवचनांप्रमाणे परमेश्वर त्याच्या वाइटासाठी त्याला इस्राएलाच्या सर्व वंशांतून वेगळे करील.
22तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरवलेले रोग पाहतील,
23आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;
24तेव्हा ते, किंबहुना सर्व राष्ट्रांतले लोक विचारतील, ‘परमेश्वराने ह्या देशाचे असे का केले असावे? एवढा कोप भडकण्याचे कारण काय?’
25तेव्हा लोक म्हणतील की, ‘ह्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून ह्यांना काढून आणतेवेळी ह्यांच्याशी जो करार केला होता तो ह्यांनी मोडला,
26व जे देव त्यांना अपरिचित होते व जे परमेश्वराने त्यांना नेमून दिले नव्हते अशा अन्य देवांची त्यांनी सेवा केली व त्यांना दंडवत घातले;
27म्हणून परमेश्वराचा कोप ह्या देशावर भडकून त्याने ह्या ग्रंथात लिहिलेला सर्व शाप त्यांना दिला.
28परमेश्वराने रागाने, क्रोधाने व महाकोपाने ह्या त्यांच्या देशातून त्यांचे उच्चाटन केले व दुसर्‍या देशात त्यांना फेकून दिले, हे आज आपण पाहतच आहोत.’
29गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत, पण प्रकट केलेल्या गोष्टी आपल्या व आपल्या वंशजांच्या निरंतरच्या आहेत; ह्याचा हेतू हा की, ह्या नियमशास्त्राची सर्व वचने आपण पाळावीत.

सध्या निवडलेले:

अनुवाद 29: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन