YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 16

16
नेमून दिलेले तीन सण
(निर्ग. 23:14-17; 34:18-24)
1अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले.
2परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडेमेंढरे आणि गाईबैल ह्यांतून वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पावा.
3त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील.
4सात दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुझ्याजवळ खमीर दिसता कामा नये; तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये.
5तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यांतील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करता येईल असे नाही, 6तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिसर देशातून निघालास त्या समयी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करावास.
7आणि तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तू तो शिजवून खावास; मग सकाळी आपल्या डेर्‍यात परत जावेस.
8सहा दिवस तू बेखमीर भाकरी खाव्यास, आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये.
9तू सात सप्ताह मोज; उभ्या पिकाला विळा लावल्यापासून सात सप्ताह मोज.
10मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सप्ताहांचा सण पाळ.
11तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.
12तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ.
13आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर तू मांडवांचा सण सात दिवस पाळावास;
14ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्यासह तू आनंदोत्सव करावास.
15जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यांत तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.
16तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये;
17तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.
न्यायदानपद्धती
18तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.
19विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.
20नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील.
21तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नकोस.
22तसेच पूजास्तंभ उभारू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.

सध्या निवडलेले:

अनुवाद 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन