YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 10

10
दगडाच्या नव्या पाट्या
(निर्ग. 34:1-10)
1त्या समयी परमेश्वर मला म्हणाला, ‘पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडव आणि त्या घेऊन माझ्याकडे पर्वतावर ये; लाकडाचा एक कोशही तयार कर.
2मग तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्या पाट्यांवर लिहीन; त्या तू कोशात ठेव.’ 3त्याप्रमाणे मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला आणि पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून व त्या हातात घेऊन पर्वतावर गेलो.
4मंडळी जमली होती त्या दिवशी जी दहा वचने परमेश्वराने पर्वतावर अग्नीतून तुम्हांला सांगितली होती तीच त्याने पहिल्याप्रमाणे ह्या पाट्यांवर लिहिली आणि त्या माझ्या स्वाधीन केल्या.
5मग मी मागे फिरून पर्वतावरून खाली उतरलो आणि मी बनवलेल्या कोशात त्या पाट्या ठेवल्या; परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे त्या तेथेच आहेत.
6इस्राएल लोक बएरोथ बनेयाकान1 येथून कूच करून मोसेरास आले. तेथे अहरोन मृत्यू पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा मुलगा एलाजार त्याच्या जागी याजकाचे काम करू लागला.
7तेथून कूच करून गुदगोदा येथे ते आले; गुदगोद्याहून ते याटबाथा येथे आले. येथे पुष्कळ वाहते ओढे आहेत.
8परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे.
9ह्यामुळेच लेवीला त्याच्या भाऊबंदांबरोबर काही वाटा किंवा वतन मिळायचे नाही; तुझा देव परमेश्वर ह्याने त्याला सांगितल्याप्रमाणे परमेश्वरच त्याचे वतन आहे. 10मी पहिल्याप्रमाणेच चाळीस दिवस व चाळीस रात्री पर्वतावर राहिलो; आणि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले; कारण तुमचा नाश करण्याची परमेश्वराची इच्छा नव्हती.
11तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, तू ह्या लोकांच्या पुढे होऊन प्रवासाला नीघ, म्हणजे जो देश त्यांना देण्याची त्यांच्या पूर्वजांशी मी शपथ वाहिली तेथे जाऊन ते तो वतन करून घेतील.’
देवाची अपेक्षा
12तर आता हे इस्राएला, तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीती करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी,
13आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा व विधी मी आज तुझ्या बर्‍यासाठी सांगत आहे ते तू पाळावेस, तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो?
14पाहा, आकाश व आकाशापलीकडचे आकाश आणि पृथ्वी व तिच्यातले सर्वकाही तुझा देव परमेश्वर ह्याचे आहे;
15असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली म्हणून त्याने त्यांच्यामागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हांला, सर्व राष्ट्रांतून आजच्याप्रमाणे निवडून घेतले, हे आज विदितच आहे.
16म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका.
17कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही.
18तो अनाथ व विधवा ह्यांचा न्याय करतो आणि परदेशीयावर प्रीती करून त्याला अन्नवस्त्र पुरवतो.
19तुम्ही परदेशीयांवर प्रीती करावी, कारण तुम्हीसुद्धा मिसर देशात परदेशीय होता.
20आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा.
21तो तुला स्तुतीचा विषय आहे, तो तुझा देव आहे, आणि ही जी महान व भयानक कृत्ये त्याने तुझ्यासाठी केली ती तू डोळ्यांनी पाहिली आहेत.
22तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.

सध्या निवडलेले:

अनुवाद 10: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन