YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 11

11
1दारयावेश मेदी ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबुती करण्यास व त्याला शक्ती देण्यास मी उभा राहिलो.
उत्तरेचा राजा व दक्षिणेचा राजा
2आता मी तुला खरे काय ते दाखवून देतो. पाहा, पारस देशात तीन राजे उत्पन्न होतील; चौथा त्या सर्वांहून धनवान होईल; तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या1 राज्याविरुद्ध उठवील.
3आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल, तो आपली सत्ता फार गाजवील आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील.
4तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून चार दिशांना त्याचे विभाग होतील; तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काहीएक येणार नाही, व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही; कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरांना देण्यात येईल.
5दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्याला राज्य प्राप्त होईल; त्याचे राज्य मोठे होईल.
6नेमलेल्या वर्षांची मुदत भरल्यावर त्यांचा आपसात मिलाफ होईल; दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे करारमदार करण्यास जाईल; तथापि तिचे बाहुबल कायम राहणार नाही आणि तो व त्याचे बाहुबलही टिकणार नाही; तर त्या स्त्रीला ज्यांनी आणले, ज्याने तिला जन्म दिला व ज्याने त्या काळात तिला बल पुरवले त्यांच्यासह तिला इतरांच्या स्वाधीन करण्यात येईल.
7तरी तिच्या कुळातला एक अंकुर त्याच्या पदावर विराजमान होईल; तो सैन्यासहवर्तमान उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करील आणि त्यांच्याबरोबर संग्राम करून यशस्वी होईल.
8तो त्यांची दैवते, ओतीव मूर्ती, आणि त्यांची सोन्यारुप्याची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल; तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील.
9तो दक्षिणेच्या राजाच्या मुलखात जाईल आणि तेथून स्वदेशी परतेल.
10तरी त्याचे पुत्र लढाई करतील व मोठे लष्कर जमा करतील; ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील; ते परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील.
11तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील; तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल.
12लष्कर जसजसे पुढे चाल करील तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल; तो लाखो लोकांना चीत करील तरी तो यशस्वी होणार नाही.
13तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल, तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल; तो काही वर्षांचा काळ संपल्यावर मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल.
14त्या काळात दक्षिणेच्या राजाविरुद्ध पुष्कळ लोक उठतील; दृष्टान्त प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी आडदांड लोक उठतील, पण ते पडतील.
15अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल; तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही; त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही; त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही.
16त्याच्यावर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील व त्याच्यासमोर कोणी टिकाव धरणार नाही; तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील.
17तो आपल्या सार्‍या राज्याच्या बलासह येईल; तरी तो त्याच्याबरोबर करारमदार करील; तो त्यांना स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल; ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही.
18नंतर तो आपला मोर्चा द्वीपाकडे फिरवील, व त्यांतली अनेक हस्तगत करील; पण त्याने लावलेला हा काळिमा एक सरदार नाहीसा करील; एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळिमा लावील.
19मग तो आपल्या देशातील दुर्गांकडे आपला मोर्चा फिरवील; पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही.
20पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील, तो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवील; पण थोड्याच दिवसांत त्याचा नाश होईल; तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही.
21मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.
22त्या लोकांचे बळ त्याच्यापुढून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल; करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल.
23त्याच्याबरोबर करार केल्यावर तो कपटाने वागेल; तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल.
24लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलांवर चालून येईल आणि त्याच्या वडिलांनी व त्या वडिलांच्या वडिलांनीही केले नाही ते तो करील; तो लुटीचे धन लोकांना वाटून देईल; काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील.
25मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिय्या व बल तो उत्तेजित करील; दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याच्याबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्याविरुद्ध मसलती करतील.
26त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करतील; त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील.
27दोन्ही राजांची मने दुष्कृत्ये करण्याकडे वळतील; ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील; पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही; कारण शेवट व्हायचा तो नेमलेल्या वेळीच होणार.
28मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल; त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल.
29नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल; तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही.
30कारण कित्तिमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील, म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील; तो परत जाईल व पवित्र करार सोडणार्‍यांबरोबर स्नेह करू पाहील.
31त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील; ते पवित्रस्थान, तो दुर्ग, ते भ्रष्ट करतील, नित्याचे बलिहवन ते बंद करतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करतील.
32जे करारासंबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील; पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करतील.
33लोकांतले जे सुज्ञ पुरुष ते पुष्कळांना बोध करतील; परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट ह्यांनी संकटात पडतील.
34ते असे संकटात पडतील तेव्हा त्यांना थोडीबहुत मदत होईल; पण पुष्कळ लोक त्यांच्याबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील.
35सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील, ते अशासाठी की, त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे; कारण नेमलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापि अवधी आहे.
36तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.
37तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवताची पर्वा करणार नाही; कारण तो स्वतःला सर्वांहून श्रेष्ठ समजेल,
38आपल्या स्थानी राहून तो दुर्गदैवतास पूज्य मानील; जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्याची तो सोने, रुपे, जवाहीर व मनोरम वस्तू ह्यांनी पूजा करील.
39एका परकीय दैवताच्या साहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल; जे कोणी त्याला मानतील त्यांना तो वैभवास चढवील; त्यांना पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल घेऊन जमीन वाटून देईल.
40अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.
41तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.
42अशा प्रकारे त्या देशांवर तो आपला हात चालवील; मिसर देशही त्याच्या हातून सुटणार नाही.
43तो मिसर देशातील सोन्यारुप्याचे निधी व सर्व मोलवान वस्तू कबजात घेईल; लुबी व कूशी हेही त्याच्यामागून चालतील.
44पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल.
45समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील; पण त्याचा अंत येईल, कोणी त्याला साहाय्य करणार नाही.”

सध्या निवडलेले:

दानीएल 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन