2 तीमथ्य 1
1
नमस्कार व उपकारस्तुती
1प्रिय मुलगा तीमथ्य ह्याला, ख्रिस्त येशूमधील जीवनविषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून :
2देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो.
3,4मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.
5तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याही ठायी आहे असा मला भरवसा आहे.
आस्था व हिंमत धरावी म्हणून बोध
6ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर.
7कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.
8म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नयेस; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे.
9त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती;
10ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.
11मला त्या सुवार्तेचा घोषणकर्ता, प्रेषित व [परराष्ट्रीयांचा] शिक्षक असे नेमले होते.
12ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.
13ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यांमध्ये दृढपणे राख.
14आपणांमध्ये वस्ती करणार्या पवित्र आत्म्याच्या योगे तुझ्या स्वाधीन केलेली ती चांगली ठेव सांभाळ.
15जे आशियात आहेत ते सर्व माझ्यापासून फुटले, हे तुला ठाऊकच आहे; त्यांत फुगल व हर्मगनेस हे आहेत.
16अनेसिफराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही;
17तर तो रोम शहरात असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला;
18(प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.
सध्या निवडलेले:
2 तीमथ्य 1: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.