२ शमुवेल 4
4
ईश-बोशेथाचा वध
1अबनेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले व सर्व इस्राएल लोक घाबरे झाले.
2शौलाच्या पुत्राजवळ दोन पुरुष सेनानायक होते; एकाचे नाव बाना व दुसर्याचे नाव रेखाब. हे बन्यामिनी वंशातला रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र. बैरोथ हे नगरही बन्यामिन्यांच्या प्रांतात मोडत आहे.
3बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत.
4शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता; इज्रेल येथून शौल व योनाथान ह्यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो पाच वर्षांचा होता; त्या वेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली; ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला; त्याचे नाव मफीबोशेथ असे होते.
5दुपारी उन्हाच्या वेळी ईश-बोशेथ आराम करीत असता रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र रेखाब व बाना हे त्याच्या घरात घुसले.
6गहू आणण्याच्या मिषाने घरात शिरून त्यांनी त्याच्या पोटावर वार केला; मग रेखाब व त्याचा भाऊ बाना हे निसटून गेले.
7ते घरात शिरले तेव्हा तो आपल्या शय्यागृहात पलंगावर निजला होता; तेथे त्यांनी त्याच्यावर प्रहार करून त्याचा वध केला व त्याचे शिर कापून घेऊन ते रातोरात अराबाच्या वाटेने गेले.
8त्यांनी ईश-बोशेथाचे शिर हेब्रोनात दाविदाकडे आणले; ते राजाला म्हणाले, “पाहा, आपला शत्रू व आपला प्राण घेऊ पाहणारा शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याचे हे शिर आहे; आज परमेश्वराने माझ्या स्वामीराजांप्रीत्यर्थ शौल व त्याचा वंश ह्यांचा सूड उगवला आहे.”
9दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ,
10आपण चांगले वर्तमान आणले आहे अशा समजुतीने एकाने मला शौलाच्या मरणाची बातमी दिली; तेव्हा मी सिकलाग येथे त्याला धरून वधले; बातमी आणल्याचे हे बक्षीस मी त्याला दिले.
11तर आता दुष्ट मनुष्यांनी एका निर्दोष मनुष्याचा त्याच्या घरात, त्याच्या पलंगावर वध केला आहे; त्याचा खुनाचा मोबदला घेण्यासाठी तुम्हांला ह्या भूतलावरून नष्ट करावे हे कितीतरी विशेष आवश्यक आहे; नाही काय?”
12दाविदाने आपल्या तरुण लोकांना आज्ञा केल्यावरून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे हातपाय तोडून त्यांना हेब्रोनाच्या तळ्याजवळ टांगले. पण ईश-बोशेथाचे शिर नेऊन त्यांनी हेब्रोनात अबनेराच्या कबरेत पुरले.
सध्या निवडलेले:
२ शमुवेल 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.