YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 5

5
दावीद इस्राएल राष्ट्राचा राजा होतो
(१ इति. 11:1-3)
1मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत, 2गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”
3ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले.
4दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
5साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि तेहेतीस वर्षे यरुशलेमेत सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर राज्य केले.
दावीद सीयोन घेतो
(१ इति. 11:4-9)
6राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी ह्यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, “तुला येथे येणे साधायचे नाही; येथले आंधळेपांगळे तुला हाकून लावतील;” त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही.
7तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर.
8त्या दिवशी दावीद म्हणाला, “जो कोणी यबूशांना मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जिवाचा द्वेष करणार्‍या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा.” ह्यावर अशी म्हण पडली आहे की, ‘येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हायचा नाही.’ 9दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.
10दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.
हीराम दाविदाला राजा म्हणून मान्य करतो
(१ इति. 14:1-2)
11सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले.
12परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले.
यरुशलेम येथे जन्मलेली दाविदाची मुले
(१ इति. 3:5-9; 14:3-7)
13मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
14यरुशलेमेत त्याला पुत्र झाले त्यांची नावे ही : शम्मूवा, शोबाब, नाथान, शलमोन,
15इभार, अलीशवा, नेफग, याफीय,
16अलीशामा, एल्यादा व अलीफलेट.
दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो
(१ इति. 14:8-17)
17दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधासाठी निघाले; हे कानी येताच दावीद खाली आपल्या गढीत गेला.
18पलिष्टी येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.
19दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”
20मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.
21पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले; त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या.
22मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.
23मग दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला असता त्याने सांगितले, “त्यांच्याशी सामना करू नकोस, तर वळसा घेऊन त्यांच्या पिछाडीस जा आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर छापा घाल.
24तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज.”
25परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.

सध्या निवडलेले:

२ शमुवेल 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन