YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 3

3
हेब्रोन येथे जन्मलेले दाविदाचे मुलगे
(१ इति. 3:1-4)
1शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले; दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले.
2हेब्रोन येथे दाविदाला पुत्र झाले ते हे : इज्रेलीण अहीनवाम हिच्यापासून त्याला अम्नोन झाला; हा त्याचा ज्येष्ठ पुत्र;
3कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;
4हग्गीथीपासून चौथा पुत्र अदोनीया झाला; अबीटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला;
5आणि दाविदाची स्त्री एग्ला हिच्यापासून सहावा पुत्र इथ्राम झाला. हेब्रोन येथे दाविदाला जे पुत्र झाले ते हे. दाविदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो 6शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अबनेराचे पाठबळ होते.
7शौलाची एक उपपत्नी होती; ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. ईश-बोशेथाने अबनेरास विचारले, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास?”
8ईश-बोशेथाचे हे शब्द ऐकून अबनेरास क्रोध आला व तो त्याला म्हणाला, “मी काय यहूदाच्या कुत्र्याचे डोके आहे? (मी काय यहूदाच्या पक्षाचा आहे?) आज तुझा बाप शौल ह्याचे घराणे आणि आप्तजन ह्यांच्यावर मी दया करीत असून तुला दाविदाच्या हाती लागू दिले नाही, आणि तू आज ह्या बायकोच्या संबंधाने मला दोष देत आहेस काय? 9-10मी शौलाच्या घराण्याकडून राज्य हिसकावून घेईन आणि दाविदाची गादी दानापासून बैरशेब्यापर्यंत इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर स्थापीन अशी आणभाक परमेश्वराने केली आहे; त्यानुसार मी त्याच्याशी वर्तन केले नाही तर देव अबनेराचे त्या मानाने, किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”
11त्याच्याने अबनेरास काहीएक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता.
12अबनेराने आपल्या नावाने दाविदाकडे जासूद पाठवून सांगितले, “हा देश कोणाचा बरे?” आणखी असेही सांगितले की, “आपण माझ्याशी सलोखा करा; सर्व इस्राएलाचे मन आपल्याकडे वळवण्याच्या कामी मी आपल्याला मदतीचा हात देतो.”
13दाविदाने म्हटले, “बरे, मी तुझ्याशी सलोखा करतो; पण एक गोष्ट तुला केली पाहिजे; ती ही की तू मला भेटायला येशील तेव्हा आपल्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिला घेऊन येणार नाहीस तर तुझी माझी भेट होणार नाही.”
14दाविदाने शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याच्याकडे जासूद पाठवून सांगितले की, “माझी स्त्री मीखल जी मी शंभर पलिष्ट्यांच्या अग्रत्वचा देऊन घेतली तिला माझ्याकडे पाठवून दे.”
15ईश-बोशेथाने लोक पाठवून तिचा नवरा लईशाचा पुत्र पालटीयेल त्याच्यापासून तिला आणले.
16तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला.
17मग अबनेराने इस्राएलांच्या वडील जनांशी बोलणे लावले की, “दाविदाने आपल्यावर राज्य करावे अशी तुमची गतकाळी इच्छा होती.
18तर आता ती पूर्ण करा; कारण परमेश्वराने दाविदाविषयी म्हटले आहे की, ‘माझा सेवक दावीद ह्याच्या द्वारे मी आपले लोक इस्राएल ह्यांना पलिष्ट्यांच्या व त्यांच्या सर्व शत्रूंच्या हातातून सोडवीन.”’
19मग अबनेराने बन्यामिनी लोकांशीही कानगोष्ट केली; आणि इस्राएलास व बन्यामिनी लोकांच्या सर्व घराण्यास जे काही इष्ट वाटले ते दाविदाच्या कानावर घालण्यासाठी तो हेब्रोनास गेला.
20अबनेर वीस पुरुष बरोबर घेऊन हेब्रोनास दाविदाकडे आला, तेव्हा दाविदाने अबनेरास व त्याच्याबरोबरच्या लोकांना मेजवानी दिली.
21अबनेर दाविदाला म्हणाला, “मी आता जातो आणि सर्व इस्राएल लोकांना माझ्या स्वामीराजांजवळ जमा करतो, म्हणजे ते आपणाशी करार करतील; मग ज्यांच्यावर राज्य करावे अशी आपली इच्छा आहे त्या सर्वांवर आपण राज्य कराल.” दाविदाने अबनेराची रवानगी केली; व तो सुखरूप निघून गेला.
यवाब अबनेरास ठार मारतो
22इकडे दाविदाचे लोक यवाबाबरोबर लुटीच्या स्वारीवरून परत आले; त्यांनी मोठी लूट आणली; पण अबनेर दाविदाजवळ हेब्रोन येथे नव्हता; कारण त्याने त्याला निरोप दिला असून तो सुखरूप निघून गेला होता.
23यवाब व त्याच्याबरोबरचे सगळे सैन्य परत आले तेव्हा यवाबाला लोकांनी सांगितले, “नेराचा पुत्र अबनेर राजाकडे आला होता; त्याची त्याने रवानगी केली व तो सुखरूप निघून गेला आहे.”
24यवाब राजाजवळ जाऊन म्हणाला, “आपण हे काय केले? अबनेर आपणाजवळ आला होता. त्याची आपण का रवानगी केली? तो हातचा पार निघून गेला.
25नेराचा पुत्र अबनेर ह्याला आपण ओळखत असालच. तो आपणांस फसवायला आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणेसवरणे ह्यांचा भेद घेण्यासाठी आला होता.”
26यवाब दाविदापासून निघून गेल्यावर त्याला नकळत यवाबाने अबनेराकडे जासूद पाठवले; आणि त्यांनी त्याला सिरा नावाच्या विहिरीपासून परत आणले.
27अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.
28पुढे दाविदाच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा तो म्हणाला, “नेराचा पुत्र अबनेर ह्याच्या खुनासंबंधाने मी व माझे राज्य परमेश्वराच्या दृष्टीने सदा निर्दोषच असणार.
29तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.”
30यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी अबनेराचा वध केला; कारण त्याने त्यांचा भाऊ असाएल ह्याला गिबोनाच्या लढाईत मारले होते.
31मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला.
32त्याने हेब्रोन येथे अबनेराला मूठमाती दिली; अबनेराच्या कबरेजवळ राजा गळा काढून रडला; सर्व लोकही रडले.
33दाविदाने अबनेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले : “मूढाप्रमाणे अबनेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय?
34तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले.
35दिवस अजून थोडा उरला होता, तेव्हा सर्व लोक दाविदाने अन्न खावे म्हणून त्याला आग्रह करण्यासाठी आले; पण दावीद शपथ घेऊन म्हणाला, “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा काही खाल्ले तर देव मला तसेच किंबहुना त्याहूनही अधिक शासन करो.”
36सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई.
37ह्यावरून सर्व लोकांच्या व सर्व इस्राएल लोकांच्या लक्षात आले की नेराचा पुत्र अबनेर ह्याचा वध राजाकडून झाला नाही.
38राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय?
39मी एवढा अभिषिक्त राजा आहे तरी आज निर्बल आहे व हे सरूवेचे पुत्र मला फार भारी आहेत; पण परमेश्वर दुष्कर्म करणार्‍यांचे त्यांच्या दुष्कर्मानुसार पारिपत्य करो.”

सध्या निवडलेले:

२ शमुवेल 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन