२ शमुवेल 22
22
दाविदाने गाइलेले मुक्तिगीत
(स्तोत्र. 18:1-50)
1परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.
2तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय.
3माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस.
4स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.
5मृत्युतरंगांनी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले.
6अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश माझ्यावर आले.
7मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.
8तेव्हा पृथ्वी हालली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.
9त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासत चालला होता. त्यामुळे निखारे धगधगत होते.
10तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.
11तो करूबारुढ होऊन उडाला, वायूच्या पंखांवर तो दृष्टीस पडला.
12त्याने आपल्याभोवती जलसंचय, आणि अंतराळातील अति घन मेघ ह्यांच्या अंधकाराचे मंडप आपल्यासभोवार केले.
13त्याच्यापुढील तेजातून निखारे धगधगत होते.
14परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली.
15त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.
16तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.
17त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलसंचयांतून मला बाहेर काढले.
18माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्यापासून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्याहून अति बलिष्ठ होते.
19माझ्या विपत्काळी ते माझ्यावर चालून आले; तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला.
20त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्याने मला सोडवले, कारण माझ्यामध्ये त्याला संतोष होता.
21परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले.
22कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही.
23तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही,
24मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.
25ह्यास्तव परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले.
26दयाळू जनांशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस;
27शुद्ध जनांशी तू शुद्ध भावनेने वागतोस कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस.
28दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस.
29हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.
30तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.
31देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
32परमेश्वराशिवाय देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे?
33देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो.
34तो माझे पाय हरिणीच्या पायांसारखे करतो, आणि मला माझ्या उच्च स्थानांवर स्थापतो.
35तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात.
36तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.
37तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस. माझे पाय घसरले नाहीत.
38मी आपल्या वैर्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला, आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही.
39मी त्यांचा धुव्वा उडवला, मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले.
40लढाईकरता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास, माझ्यावर उठलेल्यास तू माझ्याखाली चीत केलेस.
41तू माझ्या वैर्यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.
42त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही.
43तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले.
44माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; मी राष्ट्रांचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.
45परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले; माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले.
46परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले
47परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझा तारणदुर्ग जो देव त्याचा महिमा वाढो;
48त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले.
49तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस.
50ह्यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुती करीन, तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन.
51तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करतो, आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.”
सध्या निवडलेले:
२ शमुवेल 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.