YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 3:13-27

२ राजे 3:13-27 MARVBSI

अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” इस्राएलाचा राजा त्याला म्हणाला, “नाही, नाही; ह्या तीन राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.” अलीशा म्हणाला, “ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ; येथे असलेला यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला मी मान देत नसतो तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. आता एखादा वाजंत्री घेऊन या.” वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त अलीशावर आला. तो म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोर्‍यात जिकडेतिकडे खळगे खणा. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पाऊस तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल; आणि तुम्ही, तुमची पाठाळे आणि जनावरे पाणी पितील. परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे; तो मवाबी लोकांना तुमच्या हाती देईल. तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा; चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा; सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतीची नासाडी करा.” सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला. राजे एकत्र होऊन आपल्याशी लढाई करण्यासाठी येत आहेत हे मवाबी लोकांनी ऐकले तेव्हा जितके मवाबी लढाईसाठी कंबर बांधण्यास लायक होते तितके व त्यांहून अधिक वयाचे सगळे एकत्र होऊन सीमेवर उभे राहिले. दुसर्‍या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मवाबी लोकांना ते दुरून रक्तासारखे भासले. ते म्हणाले, “ते रक्तच आहे; त्या राजांचा नाश झाला आहे; त्यांनी एकमेकांना मारून टाकले आहे ह्यात संशय नाही. तर मवाब्यांनो, लूट करायला चला.” मवाबी इस्राएलाच्या छावणीनजीक आले तेव्हा इस्राएलांनी उठून त्यांना मार दिला; आणि ते त्यांच्यापुढून पळाले; इस्राएल त्यांना मारत मारत त्यांच्या देशात शिरले. त्यांनी नगरांचा विध्वंस केला; सर्व चांगल्या शेतांत प्रत्येक पुरुषाने दगड फेकले, त्यांनी ती दगडांनी भरून टाकली; पाण्याचे सर्व कूप बुजवले, सर्व चांगली झाडे तोडून टाकली; फक्‍त कीर-हरेसेथ येथे त्यांनी दगडांशिवाय काहीएक राहू दिले नाही; आणि गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला. युद्धात आपण अगदी जेर झालो असे मवाबाच्या राजाने पाहिले तेव्हा त्याने सातशे धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही. तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.