YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 3:1-12

२ राजे 3:1-12 MARVBSI

यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला; त्याने बारा वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापाइतके केले नाही; कारण त्याच्या बापाने केलेला बआलमूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकला. तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याने इस्राएलाकडून करवली त्यांचे त्याने अवलंबन केले; ती त्याने सोडली नाहीत. मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. अहाब मेल्यावर मवाबाचा राजा इस्राएलाच्या राजावर उलटला. त्या वेळी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्राएलाची जमवाजमव केली. त्याने जाऊन यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला असा निरोप पाठवला की, “मवाबाचा राजा माझ्यावर उलटला आहे, तर त्याच्याशी लढायला आपण माझ्याबरोबर येता काय?” तो म्हणाला, “हो, मी येतो; आपण आणि मी एकच; माझे लोक ते आपले लोक; माझे घोडे ते आपले घोडे.” त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.” त्याप्रमाणे इस्राएलाचा राजा, यहूदाचा राजा आणि अदोमाचा राजा ह्यांनी कूच केले; त्यांनी वळसा घेऊन सात मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे ह्यांना प्यायला पाणी मिळेना. तेव्हा इस्राएलाचा राजा म्हणाला, “अरेरे! ह्या तिघा राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणूनच परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.” तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्‍न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.” यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते.” मग इस्राएलाचा राजा, यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याच्याकडे गेले.