YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 1

1
अहज्याचा मृत्यू
1अहाबाच्या मृत्यूनंतर मवाब इस्राएलावर उलटला.
2अहज्या हा शोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला; त्याने जासुदांना अशी आज्ञा केली की, “तुम्ही जाऊन एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करा की मी ह्या दुखण्यातून बरा होईन काय?”
3इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलीया तिश्बी ह्याला म्हणाला, “ऊठ, शोमरोनाच्या राजाच्या जासुदांना जाऊन गाठ आणि विचार, ‘तुम्ही एक्रोन येथील बआल-जबूब दैवताला प्रश्‍न करायला चालला आहात, ते इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय?’
4ह्यास्तव परमेश्वर अहज्यास म्हणतो, “ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’ असे बोलून एलीया चालता झाला.
5जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्ही परत आलात ते का म्हणून?”
6त्यांनी त्याला सांगितले, “एका मनुष्याने आम्हांला वाटेत गाठून सांगितले की, ‘ज्या राजाने तुम्हांला पाठवले आहे त्याच्याकडे परत जा आणि त्याला सांगा, परमेश्वर म्हणतो तू एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्‍न करायला माणसे पाठवली ती इस्राएलात कोणी देव नाही म्हणून की काय? तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस, तू अवश्य मरशील.”’
7त्याने त्यांना विचारले, “ज्या मनुष्याने तुम्हांला गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता?”
8ते म्हणाले, “त्याच्या अंगात केसांचा झगा होता व त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता.” तो म्हणाला, “तो एलीया तिश्बीच.”
9ह्यावर राजाने पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन एलीयाकडे पाठवले. एलीया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वतशिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे की, ‘तू खाली उतरून ये.”’
10एलीयाने त्या पन्नासांच्या नायकाला म्हटले, “मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.
11मग राजाने त्याच्याकडे पुन्हा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्याला म्हणाला, “हे देवाच्या माणसा, ‘राजाज्ञा आहे की, ‘तू लवकर खाली उतरून ये.”’
12एलीया त्याला म्हणाला, “मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्याला व त्याच्या पन्नास शिपायांना भस्म केले.
13मग राजाने तिसर्‍यांदा पन्नासांच्या एका नायकाला पन्नास शिपाई देऊन पाठवले. ह्या तिसर्‍या पन्नासांच्या नायकाने जाऊन एलीयापुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, “हे देवाच्या माणसा, माझा प्राण व ह्या आपल्या पन्नास दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मोलवान वाटोत.
14पाहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले दोन नायक व त्यांचे पन्नास शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मोलवान वाटो.”
15परमेश्वराचा देवदूत एलीयाला म्हणाला, “खाली उतरून त्याच्याबरोबर जा; भिऊ नकोस.” तेव्हा एलीया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला.
16त्याने त्याला म्हटले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘एक्रोन येथले दैवत बआल-जबूब ह्याला प्रश्‍न करायला तू जासूद पाठवलेस ते इस्राएलात देव नाही म्हणून की काय? ह्यास्तव ज्या बिछान्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठणार नाहीस; तू अवश्य मरशील.”’
17एलीयाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला. त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला. यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याचा पुत्र यहोराम ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी हे झाले.
18अहज्याने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?

सध्या निवडलेले:

२ राजे 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन