१ राजे 22
22
अहाब आणि यहोशाफाट ह्यांच्या पराभवाचे मीखायाने केलेले भविष्य
(२ इति. 18:1-34)
1अरामी लोक व इस्राएल लोक ह्यांच्यामध्ये तीन वर्षे लढाई झाली नाही.
2तिसर्या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाच्या राजाकडे आला.
3तेव्हा इस्राएलाचा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “रामोथ-गिलाद आपलेच आहे हे तुम्हांला ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे? ते अरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये?”
4तो यहोशाफाटास म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच.”
5यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश विचारून घे.”
6इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ का नको?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जा; प्रभू ते महाराजांच्या हाती देईल.”
7तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्याच्याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.”
8इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.”
9तेव्हा इस्राएलाच्या राजाने एका कारभार्यास बोलावून सांगितले, “लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मीखाया ह्याला घेऊन ये.”
10इस्राएलाचा राजा आणि यहूदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शोमरोनाच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते, आणि सर्व संदेष्टे त्यांच्यापुढे भाषण करीत होते.
11तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया ह्याने लोखंडाची शिंगे करून आणली होती; तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्या शिंगांनी तू अरामी लोकांना हुंदडून त्यांचा नाश करशील.”
12सर्व संदेष्टे त्याच्याप्रमाणेच भाषण करू लागून म्हणाले, “रामोथ-गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो; कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
13जो जासूद मीखायाला बोलवायला गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्ट्यांचे एकमत होऊन ते राजासंबंधाने शुभवचन बोलत आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच तूही शुभसंदेश कथन करावास.”
14मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.”
15तो राजाकडे आला तेव्हा राजाने त्याला विचारले, “हे मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर युद्ध करायला जावे की न जावे?” त्याने त्याला म्हटले, “जा, यशस्वी हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देईल.”
16राजा त्याला म्हणाला, “परमेश्वराच्या नावाने मला खरे तेच सांग, असे मी तुला कितीदा शपथ घालून सांगावे?”
17मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”
18इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “हा माझ्यासंबंधाने अनुकूल संदेश सांगणार नाही तर प्रतिकूल सांगेल असे मी आपल्याला सांगितले नाही काय?”
19मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.
20परमेश्वर म्हणाला, ‘अहाबाला असा कोण मोह घालील की तो रामोथ-गिलादावर चाल करून तेथे पतन पावेल?’ तेव्हा कोणी असे, कोणी तसे म्हटले.
21त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’
22परमेश्वराने विचारले, ‘कसा?’ तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा होईन.’ परमेश्वर म्हणाला, ‘तू त्याला मोह घालशील; जा, तुझ्याकडून हे होईल; तसेच कर.’
23तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.”
24तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला, आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलायला कोठून गेला?”
25मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”
26मग इस्राएलाचा राजा म्हणाला, “नगराचा सुभेदार आमोन व राजपुत्र योवाश ह्यांच्याकडे मीखायाला माघारी घेऊन जा;
27आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ह्या मनुष्याला बंदीत टाका, व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”
28मीखाया म्हणाला, “तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्या द्वारे बोललाच नाही.” तो म्हणाला, “लोकहो, तुम्ही सर्व हे ऐका.”
29नंतर इस्राएलाचा राजा व यहूदाचा राजा यहोशाफाट ह्यांनी रामोथ-गिलादावर चढाई केली.
30इस्राएलाच्या राजाने यहोशाफाटाला सांगितले, “मी वेष बदलून लढाईला जाणार; पण आपण आपली स्वतःची वस्त्रे घाला.” ह्याप्रमाणे इस्राएलाचा राजा वेष बदलून लढाईला गेला.
31अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा केली होती की, ‘लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.’
32त्या रथाच्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा ते म्हणाले, “हाच इस्राएलाचा राजा आहे.” म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; तेव्हा यहोशाफाटाने आरोळी ठोकली.
33रथाच्या सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परतले.
34मग कोणीएकाने सहजगत्या एक बाण सोडला, तो जाऊन इस्राएली राजाच्या चिलखताच्या सांध्यात रुतला. तेव्हा तो आपल्या सारथ्याला म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, रथ फिरवून मला सैन्याच्या बाहेर घेऊन जा.”
35त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून उभा होता; तो संध्याकाळी मरण पावला; त्याच्या घायाचे रक्त वाहून रथाच्या तळाशी साचले.
36सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की, “प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी.”
37राजा मरण पावल्यावर त्याला शोमरोनाला नेले; शोमरोन येथे त्यांनी त्याला मूठमाती दिली.
38राजाचा रथ शोमरोनाच्या तळ्यानजीक धुतला तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे कुत्र्यांनी येऊन त्याचे रक्त चाटून खाल्ले; ती वेश्यांची स्नान करण्याची जागा होती.
39अहाबाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने जे काही केले ते, त्याने बांधलेले हस्तिदंती गृह, त्याने वसवलेली सर्व नगरे ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
40अहाब आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, आणि त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.
यहोशाफाटाची कारकीर्द
(२ इति. 20:31-37)
41इस्राएलाचा राजा अहाब ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदावर राज्य करू लागला.
42यहोशाफाट राज्य करू लागला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजूबा; ती शिल्हीची कन्या.
43त्याची सगळी चालचलणूक त्याचा पिता आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; तथापि त्याने उच्च स्थाने काढून टाकली नाहीत; लोक अजून त्या उच्च स्थानांवर यज्ञ करीत व धूप जाळीत.
44यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाशी तह केला.
45यहोशाफाटाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने दाखवलेला पराक्रम, त्याने केलेली युद्धे, ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
46त्याचा पिता आसा ह्याच्या वेळी जे पुरुषगामी राहून गेले होते त्यांना त्याने देशातून घालवून दिले.
47त्या काळी अदोमात कोणी राजा नव्हता; एक मुतालीक (कारभारी) राज्य चालवत होता.
48सोने आणण्यासाठी ओफीर येथे जाता यावे म्हणून यहोशाफाटाने तार्शीशी गलबते बांधली; ती एसयोन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती गेली नाहीत.
49तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्या यहोशाफाटाला म्हणाला, “माझे सेवक आपल्या सेवकांबरोबर जहाजातून जाऊ द्या;” पण यहोशफाटाने नकार दिला.
50यहोशाफाट आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये, मूळ पुरुष दावीद ह्याच्या नगरामध्ये मूठमाती दिली; आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोराम राजा झाला.
इस्राएलाचा राजा अहज्या ह्याची कारकीर्द
51यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर दोन वर्षे राज्य केले.
52परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या आईबापांच्या आणि इस्राएल लोकांच्या हातून पाप करवणारा नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या मार्गाने तो चालला.
53आपल्या बापाप्रमाणे त्याने बआलाच्या मूर्तींचे भजनपूजन करून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले.
सध्या निवडलेले:
१ राजे 22: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.