YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 26

26
उज्जीया राजाची कारकीर्द
(२ राजे 15:1-7)
1उज्जीया1 सोळा वर्षांचा असताना सर्व यहूदी लोकांनी त्याला त्याचा बाप अमस्या ह्याच्या जागी राजा केले.
2अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जीयाने एलोथाची मजबुती करून पुन्हा ते यहूदाच्या सत्तेत आणले.
3उज्जीया राज्य करू लागला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत बावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यखिल्या; ती यरुशलेमेची होती.
4त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी.
5देवाचे दृष्टान्त जाणणारा जखर्‍या ह्याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले.
6त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले; गथ, यन्नो व अश्दोद ह्यांचे कोट पाडून टाकले आणि अश्दोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसवली.
7पलिष्टी, गुर-बालवासी अरब व मऊनी ह्यांच्याविरुद्ध देवाने त्याला साहाय्य केले.
8अम्मोनी लोक उज्जीयाला कर देत असत. त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली, कारण तो महासमर्थ झाला.
9उज्जीयाने यरुशलेमेत कोपरावेशीजवळ, खोरेवेशीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरूज बांधून त्यांना बळकटी आणली.
10त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.
11उज्जीयाजवळ लढाऊ लोकांचे सैन्य असे; राजाच्या सेनानायकांपैकी एक हनन्या म्हणून होता; त्याच्या हाताखालचा यइएल लेखक व मासेया कारभारी हे गणती करीत, त्यानुसार ते सैन्य टोळीटोळीने लढाईस जात असे.
12पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूर वीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती.
13त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवायत शिकलेली फौज होती; शत्रूच्या विरुद्ध राजाला कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत.
14ह्या सर्व सेनेसाठी उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफणगुंडे तयार केले.
15यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली; त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली; त्याला इतके विलक्षण साहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला.
16तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला, आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
17अजर्‍या याजक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले ऐंशी वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले.
18त्यांनी उज्जीया राजाला प्रतिकार करून म्हटले, “हे उज्जीया, परमेश्वराप्रीत्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे; अहरोनाचे वंशज जे याजक, ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे, त्यांचेच हे काम आहे. तू पवित्रस्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहेस; अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.”
19तेव्हा उज्जीयाला क्रोध आला, धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते; आणि तो याजकांवर संतापला असता, त्यांच्यादेखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले.
20मुख्य याजक अजर्‍या व दुसरे सर्व याजक ह्यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालवून दिले; परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला.
21उज्जीया राजा आमरण कोडी राहिला; तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे; त्याला परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले, व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला.
22उज्जीयाची अथपासून इतिपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याने लिहिली आहेत.
23उज्जीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; तो कोडी होता म्हणून राजांच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 26: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन