YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 15

15
आसाने केलेल्या सुधारणा
(१ राजे 15:13-15)
1मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्‍या ह्याला स्फूर्ती दिली;
2तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.
3बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्‍या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते;
4पण ते आपल्या संकटावस्थेत इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यांना पावला.
5त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत.
6राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे;
7पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.”
8आसाने ही वचने व ओदेद संदेष्ट्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्याला धीर आला व त्याने यहूदा व बन्यामीन ह्यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राइमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यांतून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडीपुढे होती तिचा जीर्णोद्धार केला.
9त्याने सर्व यहूदी व बन्यामिनी लोकांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या एफ्राईम, मनश्शे व शिमोन ह्या प्रांतांतल्या लोकांना एकत्र केले; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा इस्राएलातले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले.
10आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसर्‍या महिन्यात ते यरुशलेमेत एकत्र झाले.
11त्यांनी आणलेल्या लुटीतून सातशे बैल व सात हजार शेरडेमेंढरे त्या दिवशी परमेश्वराला अर्पण केली.
12त्यांनी असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला शरण जाऊ;
13लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोणी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा.
14त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली.
15सर्व यहूदी लोक आणभाक करून हर्षभरित झाले; त्यांनी मनःपूर्वक शपथ वाहिली, ते मोठ्या उत्कंठेने त्याला शरण गेले आणि तो त्यांना पावला; परमेश्वराने त्यांना चोहोकडून स्वास्थ्य दिले.
16आसा राजाने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती; तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली.
17त्याने उच्च स्थाने इस्राएलातून काढून टाकली नाहीत; तथापि आसाचे हृदय सार्‍या हयातीत सात्त्विक राहिले.
18त्याच्या बापाने व त्याने स्वत: सोने, चांदी व पात्रे परमेश्वराला वाहिली होती ती सर्व त्याने देवाच्या मंदिरात नेऊन ठेवली.
19आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत पुन्हा युद्ध झाले नाही.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 15: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन