YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 16

16
बेन-हदादाबरोबर आसाने केलेला सलोखा
(१ राजे 15:16-24)
1आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशा ह्याने यहूदावर स्वारी केली; यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्राएलाचा राजा बाशा ह्याने रामा नगराची मजबुती केली.
2परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद ह्याच्याकडे पाठवली; आणि त्याला असे सांगून पाठवले की 3“माझ्या बापाचा व आपल्या बापाचा सलोखा होता तसा आपला व माझा सलोखा होवो; तर पाहा; मी आपणाला सोने व चांदी पाठवली आहे. इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्याशी केलेला करार मोडून टाका म्हणजे तो माझ्यामागे लागण्याचे सोडून देईल.”
4आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सैन्याच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-मईम व नफतालीची सर्व भांडारनगरे जिंकली.
5हे ऐकून रामा शहराची मजबुती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकले.
6आसा राजाने सर्व यहूदी लोकांना बोलावून आणले व जे दगड व जी लाकडे घेऊन बाशा रामा नगराची तटबंदी करत होता ती त्याने काढून नेली आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लावली.
7त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे येऊन म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भरवसा ठेवला नाहीस व अरामाच्या राजावर भरवसा ठेवला म्हणून अरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे.
8कूशी व लूबी ह्यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्यांच्याजवळ बहुत रथ व घोडेस्वार नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेवली म्हणून त्याने त्यांना तुझ्या हाती दिले.
9परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”
10हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला, व त्याने त्याला अटकेत ठेवले; कारण त्यामुळे तो त्याच्यावर फार कोपायमान झाला होता. ह्याच सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालवला.
11आसाची अथपासून इतिपर्यंतची सगळी कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिलेली आहेत.
12आसाच्या पायांना त्याच्या कारकिर्दीच्या एकोण-चाळिसाव्या वर्षी व्याधी झाला; तो व्याधी बराच वाढला; तथापि त्या रोगात तो परमेश्वराला शरण न जाता वैद्यांना शरण गेला.
13मग आसा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; तो आपल्या कारकिर्दीच्या एकेचाळिसाव्या वर्षी मृत्यू पावला.
14दावीदपुरात जे थडगे त्याने खोदवले होते त्यात त्याला मूठमाती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गांध्यांनी केलेले तर्‍हेतर्‍हेचे मसाले ह्यांनी भरलेल्या बिछान्यावर त्याला त्यांनी निजवले व त्याच्याप्रीत्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळली.

सध्या निवडलेले:

२ इतिहास 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन