YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 5

5
1वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर.
2तरुणांना बंधूसमान मानून, वडील स्त्रियांना मातांसमान मानून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान मानून बोध कर.
ख्रिस्ती मंडळीतील विधवांचा परामर्ष
3ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर.
4कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधार्‍या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.
5जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते;
6परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे.
7त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांग.
8जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.
9जी साठ वर्षांच्या आत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल,
10जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.
11परंतु तरुण विधवांना नोंदवू नये, कारण जेव्हा त्या कामुक होऊन ख्रिस्ताला सोडतात तेव्हा त्या लग्न करायला पाहतात.
12अशाने त्यांना शासन होईल, कारण त्यांनी आपल्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला.
13शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे, तर वटवट्या व लुडबुड्या होतात, आणि बोलू नये ते बोलतात.
14म्हणून माझी इच्छा अशी आहे की, तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावीत, घर चालवावे आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये.
15कारण कित्येक बहकून सैतानामागे जाऊन चुकल्या आहेत.
16जर कोणा विश्वास ठेवणार्‍या पुरुषाच्या अथवा स्त्रीच्या येथे विधवा असल्या, तर त्यांनी त्यांची तरतूद करावी, मंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये; म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची मंडळीला तरतूद करता येईल.
वडील
17जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत.
18कारण शास्त्र म्हणते, “बैल मळणी करत असता त्याला मुसके बांधू नकोस,” आणि “कामकर्‍याला आपली मजुरी मिळणे योग्य आहे.”
19‘दोन किंवा तीन साक्षीदार’ असल्यावाचून कोणत्याही वडिलावरील आरोप स्वीकारू नकोस.
20बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणार्‍यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.
21देव, प्रभू येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत ह्यांच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो की, मनात अढी न धरता ह्या आज्ञा पाळ, पक्षपाताने काही करू नकोस.
22उतावळीने कोणावर हात ठेवू नकोस, आणि दुसर्‍यांच्या पापात तुझे अंग असू नये; स्वतःला शुद्ध राख.
23ह्यापुढे नुसते पाणीच पीत राहू नकोस, तर आपल्या पोटासाठी आणि वारंवार होणार्‍या आपल्या दुखण्यांसाठी थोडा द्राक्षारस घे.
24कित्येक माणसांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात, आणि कित्येकांची मागून जातात.
25त्याचप्रमाणे काही चांगली कृत्येही उघड आहेत, आणि जी गुप्त आहेत तीही गुप्त राहू शकत नाहीत.

सध्या निवडलेले:

1 तीमथ्य 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन