इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला. तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे. तर तंतुवाद्य वाजवण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामींनी आपल्या तैनातीच्या सेवकांना आज्ञा द्यावी; असे केल्यास देवाकडील दुरात्म्याची आपणाला बाधा होईल तेव्हा तो आपल्या हाताने वाद्य वाजवील व आपणाला बरे वाटेल.” ह्यावरून शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक उत्तम वाद्य वाजवणारा पाहून त्याला माझ्याकडे घेऊन या.” तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.” हे ऐकून शौलाने जासूद पाठवून इशायाला निरोप केला की, “तुझा पुत्र दावीद शेरडेमेंढरे राखत आहे त्याला माझ्याकडे पाठवून दे.” मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले. दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला; शौल त्याच्यावर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला. शौलाने इशायाला सांगून पाठवले की, ‘दाविदाला माझ्या तैनातीस राहू दे. कारण माझी त्याच्यावर मर्जी बसली आहे.” जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे; मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे, व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे.
१ शमुवेल 16 वाचा
ऐका १ शमुवेल 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 16:14-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ