YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 16

16
राजपदासाठी दाविदाचा तैलाभ्यंग
1मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”
2शमुवेल म्हणाला, “मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जिवे मारील.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की, ‘मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करायला आलो आहे.’ 3मग यज्ञासाठी येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन; मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर.”
4परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमुवेलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले, व त्यांनी त्याला विचारले, “आपण स्नेहभावाने आला आहात काय?”
5तो म्हणाला, “मी स्नेहभावाने आलो आहे; मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्याबरोबर यज्ञाला या.” त्याने इशाय व त्याचे पुत्र ह्यांना पवित्र होऊन यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले.
6ते आले तेव्हा त्याने अलीयाबास न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय.”
7पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”
8मग इशायाने अबीनादाबास बोलावून शमुवेलापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.”
9मग इशायाने शाम्मा ह्याला त्याच्यापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.”
10ह्या प्रकारे इशायाने आपले सात पुत्र शमुवेलापुढून चालवले. शमुवेलाने इशायाला म्हटले, “ह्यांतला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही.
11शमुवेलाने इशायाला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय?” तो म्हणाला, “एक सर्वांत धाकटा राहिला आहे; पण पाहा, तो शेरडेमेंढरे राखत आहे.” तेव्हा शमुवेल इशायाला म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही.”
12त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ऊठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे.”
13मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.
शौलाला रंजवण्यासाठी दावीद वीणा वाजवतो
14इकडे परमेश्वराचा आत्मा शौलाला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला.
15तेव्हा शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे.
16तर तंतुवाद्य वाजवण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामींनी आपल्या तैनातीच्या सेवकांना आज्ञा द्यावी; असे केल्यास देवाकडील दुरात्म्याची आपणाला बाधा होईल तेव्हा तो आपल्या हाताने वाद्य वाजवील व आपणाला बरे वाटेल.”
17ह्यावरून शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक उत्तम वाद्य वाजवणारा पाहून त्याला माझ्याकडे घेऊन या.”
18तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.”
19हे ऐकून शौलाने जासूद पाठवून इशायाला निरोप केला की, “तुझा पुत्र दावीद शेरडेमेंढरे राखत आहे त्याला माझ्याकडे पाठवून दे.”
20मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले.
21दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला; शौल त्याच्यावर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला.
22शौलाने इशायाला सांगून पाठवले की, ‘दाविदाला माझ्या तैनातीस राहू दे. कारण माझी त्याच्यावर मर्जी बसली आहे.”
23जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे; मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे, व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे.

सध्या निवडलेले:

१ शमुवेल 16: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन