YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 6

6
शलमोन परमेश्वरासाठी निवासस्थान बांधतो
(२ इति. 3:1-14)
1इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चारशे ऐंशीव्या वर्षी, इस्राएलावरील शलमोनाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, दुसर्‍या म्हणजे जिव नावाच्या महिन्यात शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
2शलमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात व उंची तीस हात होती.
3मंदिराच्या पवित्रस्थानापुढील देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रुंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर तिची रुंदी दहा हात होती.
4त्याने मंदिरास खिडक्या केल्या, त्यांना जाळ्या कायम बसवल्या होत्या.
5आणखी मंदिराच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि तसेच मंदिराचे पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान ह्यांच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि मंदिराच्या सभोवार कोठड्या केल्या;
6सर्वांत खालच्या मजल्याची रुंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या आसपासच्या भिंतींना बाहेरून तोडे ठेवले होते, ते अशासाठी की मंदिराच्या भिंतींत तुळया शिरू नयेत.
7खाणीपाशीच घडलेले चिरे आयते आणून ते मंदिर बांधले; ते बांधत असताना हातोडा, कुर्‍हाड किंवा अशा कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिरात ऐकू आला नाही.
8बाहेरच्या कोठड्यांतील मजल्यांचे दार मंदिराच्या उजव्या बाजूस होते; लोक नागमोडी शिडी चढून मधल्या कोठड्यांत जात; आणि मधल्यांतून वरच्या कोठड्यांत जात.
9ह्या प्रकारे त्याने मंदिर बांधून पुरे केले व त्याला त्याने गंधसरूच्या फळ्या व तुळया ह्यांचा कडीपाट केला.
10सर्व मंदिराला लागून जे मजले होते ते पाच-पाच हात उंच होते व ते गंधसरूच्या तुळयांनी मंदिराला भिडवले होते.
11मग परमेश्वराचे हे वचन शलमोनाला प्राप्त झाले :
12“तू हे मंदिर बांधत आहेस, त्या अर्थी तू माझ्या नियमांप्रमाणे चाललास, माझे निर्णय पाळलेस व माझ्या सर्व आज्ञा मानून त्याप्रमाणे वागलास तर मी जे वचन तुझा बाप दावीद ह्याला दिले ते तुझ्याशी कायम करीन.
13मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”
14शलमोनाने ते मंदिर बांधून पुरे केले.
15त्याने त्या मंदिराच्या भिंतींना आतल्या बाजूने गंधसरूंच्या तक्त्यांची मढवणी केली; जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीला त्याने देवदारूची तक्तपोशी केली.
16मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत वीस हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली; ह्या प्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला.
17त्या गाभार्‍यासमोरील मंदिराची लांबी चाळीस हात होती.
18आतल्या भागी मंदिराच्या भिंती गंधसरूच्या तक्त्यांनी मढवल्या असून त्यांवर इंद्रावणे (रानकाकड्या) व फुललेली फुले कोरली होती; चोहीकडे गंधसरूच होता, दगड असा मुळीच दृष्टीला पडत नसे.
19मंदिराच्या आतल्या भागी परमेश्वराच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने एक गाभारा तयार केला.
20त्या गाभार्‍याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढवला होता; गंधसरूची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवली.
21शलमोनाने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढवले. परमपवित्रस्थानास त्याने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या व ते परमपवित्रस्थानही सोन्याने मढवले.
22त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने परमपवित्रस्थानाला लागून असलेली वेदी सगळी सोन्याने मढवली.
23जैतून लाकडाचे दहा-दहा हात उंच असे दोन करूब करून त्याने गाभार्‍यात ठेवले.
24करूबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसर्‍या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
25दुसरा करूबही दहा हात उंच होता; दोन्ही करूब एका मापाचे व एका आकाराचे होते.
26एका करूबाची उंची दहा हात होती, दुसर्‍या करूबाचीही तेवढीच होती.
27आतल्या गाभार्‍यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्‍या करूबाचा एक पंख दुसर्‍या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्‍याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते.
28त्याने ते करूब सोन्याने मढवले.
29त्या मंदिराच्या सर्व भिंतींवर सभोवार आतून व बाहेरून करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती.
30त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढवली होती.
31गाभार्‍याच्या दारांना त्याने जैतून लाकडाची कवाडे लावली होती; कपाळपट्टी व दाराच्या बाह्या ह्यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
32ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून त्याने त्यांवर करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली असून ती सोन्याने मढवली होती; करूबांवर व खजुरीच्या झाडांवरही सोने लावले होते.
33त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाची चौकट बनवली होती; तिने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता.
34आणि त्याची दोन कवाडे देवदारूची होती; प्रत्येक कवाडाला दोन-दोन दुमटण्या होत्या.
35त्याने त्यांवरही करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती, व हे खोदकाम सोन्याने मढवले होते.
36त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्‍यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती.
37चौथ्या वर्षी जिव महिन्यात परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला;
38आणि अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजे आठव्या महिन्यात मंदिर आतल्या एकंदर उपकरणसाहित्यासहित नमुन्याप्रमाणे पुरे झाले. ह्याप्रमाणे ते मंदिर बांधण्यासाठी शलमोनाला सात वर्षे लागली.

सध्या निवडलेले:

१ राजे 6: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन