YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 14

14
अहीयाने यराबामाविरुद्ध दिलेला संदेश
1त्या काळात यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला.
2तेव्हा यराबाम आपल्या स्त्रीला म्हणाला, “चल, तू यराबामाची स्त्री आहेस हे कोणाला ओळखता येणार नाही अशा प्रकारे वेष पालट आणि शिलो येथे जा; जो माझ्याविषयी बोलला होता की, मी ह्या लोकांचा राजा होईन तो अहीया संदेष्टा येथे राहतो.
3तू दहा भाकरी, पुर्‍या व मधाची कुपी बरोबर घेऊन त्याच्याकडे जा; मुलाचे काय होईल ते तो तुला सांगेल.”
4यराबामाच्या स्त्रीने तसे केले. ती निघून शिलोस अहीयाच्या घरी गेली. अहीयाला दिसत नव्हते; कारण वृद्धपणामुळे त्याची दृष्टी मंद झाली होती.
5परमेश्वर अहीयाला म्हणाला, “यराबामाची स्त्री आपल्या मुलाविषयी विचारण्यासाठी येत आहे; तो आजारी आहे; तू तिला असे सांग; आपण कोणी दुसरी स्त्री आहोत असे सोंग करून ती आत येईल.”
6ती दाराजवळ येत असताना तिच्या पावलांचा आवाज ऐकून अहीया तिला म्हणाला, “हे यराबामाच्या पत्नी, आत ये; आपण दुसरीच कोणी आहोत असे सोंग तू का करतेस? तुला काही दुःखाचा संदेश सांगणे मला प्राप्त झाले आहे.
7जा, यराबामाला सांग, इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुला लोकांतून निवडून उन्नत केले, माझे लोक इस्राएल ह्यांचा तुला मी नायक नेमले,
8आणि दाविदाच्या घराण्यापासून राज्य काढून घेऊन तुला दिले; तरी तू माझा सेवक दावीद ह्याच्याप्रमाणे वागला नाहीस. दावीद माझ्या आज्ञा पाळत असे; तो मला जिवेभावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने जे योग्य तेच तो करीत असे;
9पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केले आहेस; मला सोडून तू अन्य देव व ओतीव मूर्ती केल्या आहेत; अशाने तू मला चिडवून संतप्त केले आहे आणि माझ्याकडे पाठ केली आहेस.
10ह्यास्तव, पाहा, मी यराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणीन, यराबामाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करीन, मग तो इस्राएलाच्या बंदीत असो की मोकळा असो; ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकतात त्याप्रमाणे मी यराबामाचे घराणे काढून टाकीन.
11यराबामाच्या घराण्यातला जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातली पाखरे खाऊन टाकतील, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
12तर आता ऊठ, आपल्या घरी जा; तुझे पाय नगरात पडताच तुझे मूल मरेल.
13सर्व इस्राएल त्याच्यासाठी शोक करून त्याला पुरतील; यराबामाच्या घराण्यात त्यालाच काय ती मूठमाती मिळेल, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासंबंधाने यराबामाच्या घराण्यात त्याच्याच ठायी काहीसा चांगुलपणा दिसून आला आहे.
14मग परमेश्वर इस्राएलावर असा राजा स्थापील की तो त्याच दिवशी यराबामाच्या घराण्याचा उच्छेद करील. मी काय म्हणतो? आताच तो स्थापला आहे.
15बोरू पाण्यात कापतो त्याप्रमाणे परमेश्वर इस्राएलास हाणून कापवील व जी उत्तम भूमी त्याने त्यांच्या पूर्वजांना दिली होती तिच्यातून त्यांना उपटून काढून नदीपलीकडे त्यांची पांगापांग करील, कारण त्यांनी अशेरा मूर्ती बनवून परमेश्वराला संतप्त केले.
16यराबामाने जी पातके स्वत: केली व इस्राएलांकडून करवली त्यामुळे परमेश्वर इस्राएलांचा त्याग करील.”
17यराबामाची बायको निघून तिरसा येथे आली. तिचा पाय घराच्या उंबरठ्यास लागताच मूल मेले.
18परमेश्वराने आपला सेवक अहीया संदेष्टा ह्याच्या द्वारे जे वचन कळवले होते त्यानुसार सर्व इस्राएलाने त्याला मूठमाती दिली व त्याच्यासाठी शोक केला.
19यराबामाने इतर कोणत्या गोष्टी केल्या, युद्ध कसे केले व राज्य कसे चालवले ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे.
20यराबाम बावीस वर्षे राज्य करून आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा पुत्र नादाब हा त्याच्या जागी राजा झाला.
रहबामाची कारकीर्द
(२ इति. 12:1-16)
21इकडे शलमोनाचा पुत्र रहबाम हा यहूदावर राज्य करीत होता. रहबाम राज्य करू लागला तेव्हा तो एकेचाळीस वर्षांचा होता; आपल्या नामाची स्थापना करावी म्हणून परमेश्वराने सर्व इस्राएल वंशातून यरुशलेम नगर निवडले. तेथे त्याने सतरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती.
22परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते यहूदाचे लोक करू लागले; त्यांच्या पूर्वजांपेक्षाही त्यांनी जी अधिक पातके केली त्यामुळे त्यांनी परमेश्वराला ईर्ष्येस पेटवले.
23त्यांनी प्रत्येक उंच टेकडीवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली उच्च स्थाने, स्तंभ आणि अशेरा मूर्ती स्थापल्या.
24आणि त्या देशात पुरुषगामीही होते; ज्या सर्व राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएलासमोरून हाकून दिले होते त्यांच्या अमंगळ कर्मांप्रमाणे हे करू लागले.
25रहबाम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी मिसर देशचा राजा शिशक ह्याने यरुशलेमेवर स्वारी केली.
26त्याने परमेश्वराच्या मंदिरांतील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले; शलमोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या.
27रहबाम राजाने त्यांच्याऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणार्‍यांच्या व राजवाड्याची रखवाली करत होते त्यांच्या स्वाधीन त्या केल्या.
28राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा हे धावणारे त्या ढाली घेऊन पुढे चालत आणि मग त्या आपल्या चौकीत आणून ठेवत.
29यराबामाने केलेल्या इतर गोष्टींचे व जे जे काही त्याने केले त्यांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
30रहबाम व यराबाम ह्यांच्यामध्ये लढाई सतत चालू होती.
31रहबाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, व त्यांनी त्याला दावीदपुरात त्यांच्या पितरांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; त्याच्या आईचे नाव नामा; ती अम्मोनीण होती. त्याचा पुत्र अबीयाम1 हा त्याच्या जागी राजा झाला.

सध्या निवडलेले:

१ राजे 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन