YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 3:11-24

1 योहान 3:11-24 MARVBSI

जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्‍चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. आपण सत्याचे आहोत हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वत:ला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वत:च्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्वकाही कळते. प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्या ठायी राहतो.