1 योहान 3:11-24
1 योहान 3:11-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्ये न्यायी होती. बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी. यावरुन आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत व त्याच्यासमोर आपल्या अंतःकरणाला धैर्य देऊ, कारण जर आपले अंतःकरण आपल्याला दोषी ठरवते, तर आपल्या अंतःकरणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्वकाही जाणतो. प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हास दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हास धैर्य आहे. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो. तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो.
1 योहान 3:11-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण आपण एकमेकांवर प्रीती करावी हाच संदेश तुम्ही सुरुवातीपासून ऐकला आहे. आपण काईनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याने त्याचा वध का केला? कारण काईनाची कृत्ये वाईट होत्या आणि त्याच्या भावाची कृत्ये नीतियुक्त होती. म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो जगाने तुमचा द्वेष केला, तर आश्चर्य करू नका. आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात. जे कोणी भावाचा आणि बहिणीचा द्वेष करतात ते खुनी आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही खुनी व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही. प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे. जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल? प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी. यावरून आपल्याला माहीत होते की, आपण सत्याच्या पक्षाचे आहोत आणि त्याच्या समक्षतेत आपली हृदये विसावतात. जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत असतील तर हे लक्षात ठेवा की, परमेश्वर आपल्या अंतःकरणापेक्षा महान आहेत आणि ते सर्वकाही जाणतात. प्रिय मित्रांनो, जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत नसतील तर परमेश्वरासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्या गोष्टी करतो. ही त्यांची आज्ञा आहेः त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी. जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते.
1 योहान 3:11-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. आपण सत्याचे आहोत हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वत:ला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वत:च्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्वकाही कळते. प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्या ठायी राहतो.
1 योहान 3:11-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची कृत्ये नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपणास कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही, तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकामध्ये शाश्वत जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी. आपण सत्याचे आहोत, हे ह्यावरून आपल्याला कळून येईल आणि अशा प्रकारे आपण त्याच्यासमोर आत्मविश्वास बाळगू. जर आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, तर आपल्याला ठाऊक आहे की, आपल्या मनापेक्षा देव थोर आहे व त्याला सर्व काही कळते. प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवीत नसेल, तर देवासमोर येण्याचे आपण धैर्य बाळगतो. आपण जे काही मागतो, ते त्याच्याकडून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते, ते करतो. त्याची आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्याबरोबर एकनिष्ठ राहतो व तो त्या माणसामध्ये राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्यामध्ये राहतो.