उत्पत्ती 46
46
याकोब आपल्या कुटुंबासह मिसरास येतो
1तेव्हा इस्राएल आपल्या सर्वांसह निघून बैरशेबास आला; तेथे त्याने आपला पिता इसहाक ह्याच्या देवाला यज्ञ केले.
2तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?”
3तो म्हणाला, “मी देव, तुझ्या पित्याचा देव आहे; तू मिसरात जायला भिऊ नकोस; तेथे तुझे मी एक मोठे राष्ट्र करीन.
4मी तुझ्याबरोबर मिसरात येईन, तेथून मी तुला खात्रीने परत आणीन, आणि योसेफ आपल्या हाताने तुझे डोळे झाकील.”
5मग याकोब बैर-शेबाहून निघाला, आणि त्याला नेण्यासाठी फारोने पाठवलेल्या गाड्यांत इस्राएलाच्या मुलांनी आपला पिता याकोब आणि आपली बायकामुले बसवून नेली.
6ते आपली गुरेढोरे आणि कनान देशात मिळवलेले धन घेऊन मिसर देशात आले; ह्याप्रमाणे याकोब व त्याची सर्व संतती मिसर देशात आली;
7त्याने आपल्याबरोबर आपले मुलगे व नातू, मुली व नाती वगैरे सर्व संतती मिसरात आणली.
8इस्राएलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्रपौत्र मिसरात गेले त्यांची नावे ही : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन, 9रऊबेनाचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कार्मी.
10शिमोनाचे मुलगे यमुवेल, यामीन, ओहाद, याकीन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.
11लेवीचे मुलगे गेर्षोन, कहाथ व मरारी.
12यहूदाचे मुलगे : एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; ह्यापैकी एर व ओनान हे कनान देशात मृत्यू पावले होते. पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.
13इस्साखाराचे मुलगे तोला, पुवा, योब व शिम्रोन.
14जबुलूनाचे मुलगे सेरेद, एलोन व याहलेल.
15हे सर्व लेआचे मुलगे व तिची मुलगी दीना ही तिला याकोबापासून पदन-अरामात झाली; त्याचे मुलगे व मुली मिळून तेहेतीस जण होते.
16गादाचे मुलगे सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी अरोदी व अरेली.
17आशेराचे मुलगे इम्ना, इश्वा, इश्वी व बरीया; आणि त्यांची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.
18लाबानाने आपली मुलगी लेआ हिला दिलेल्या जिल्पेचे हे मुलगे, तिला हे सोळा जण याकोबापासून झाले.
19याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे योसेफ व बन्यामीन.
20मिसर देशात ओनचा याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्या पोटी योसेफाला मनश्शे व एफ्राईम हे झाले.
21बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.
22हे मुलगे याकोबापासून राहेलीला झाले; ते सर्व चौदा जण होते.
23दानाचा मुलगा हुशीम.
24नफतालीचे मुलगे यासहेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.
25लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे हे मुलगे. तिला हे सात जण याकोबापासून झाले.
26याकोबाच्या वंशातली जी माणसे मिसरात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून सहासष्ट होती.
27योसेफाला मिसर देशात झालेले दोन मुलगे हे मिळून याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात आले ते एकंदर सत्तर जण होते.
याकोब आणि त्याचे कुटुंब ह्यांचे मिसर देशात वास्तव्य
28योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहूदाला आपल्यापुढे त्याच्याकडे पाठवले; ह्याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले.
29योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राएल ह्याला भेटायला गोशेन प्रांतास गेला; त्याला भेटून त्याच्या गळ्यास त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला.
30तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.”
31योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या बापाच्या घरच्यांना म्हणाला, “मी जाऊन फारोला खबर देतो की, कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे माझ्याकडे आली आहेत;
32हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत म्हणून ते आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत.
33फारो तुम्हांला बोलावून विचारील की, ‘तुमचा धंदा काय आहे?’
34तेव्हा तुम्ही सांगा की, ‘बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत, आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे.’ अशाने तुम्हांला गोशेन प्रांतात राहायला मिळेल; कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकांना किळस वाटते.”
Voafantina amin'izao fotoana izao:
उत्पत्ती 46: MARVBSI
Asongadina
Hizara
Dika mitovy
Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.