Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

उत्पत्ती 37

37
योसेफ आणि त्याचे भाऊ
1याकोब कनान देशात वस्ती करून राहिला; तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता.
2याकोब वंशाचा वृत्तान्त1 हा : योसेफ सतरा वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली.
3इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता; त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता.
4आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले.
5योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
6तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न ऐका : 7पाहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली; तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले.”
8हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “काय, तू आमच्यावर राज्य करणार? तू आमच्यावर सत्ता चालवणार?” आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले.
9पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले, तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की, सूर्य, चंद्र व अकरा तारे ह्यांनी मला नमन केले.”
10त्याने हे स्वप्न आपल्या बापाला व भावांना सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, “हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यासाठी तुझ्यापुढे येणार?”
11त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात 12ह्यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेमास गेले.
13मग इस्राएल योसेफास म्हणाला, “तुझे भाऊ शखेमास कळप चारत आहेत ना? तर चल, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो.” तो म्हणाला, “हा मी तयार आहे.”
14तेव्हा त्याने त्याला सांगितले, “जा. तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पाहा आणि मला येऊन सांग.” ह्याप्रमाणे त्याने त्याला हेब्रोन खोर्‍यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहचला.
15तो तेथे रानात इकडेतिकडे भटकत असता एका मनुष्याला आढळला, तेव्हा त्याने त्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?”
16तो म्हणाला, “मी आपल्या भावांना शोधत आहे. ते कोठे कळप चारत आहेत तेवढे मला सांगा.”
17तो मनुष्य म्हणाला, “ते येथून निघून गेले आहेत; आपण दोथानास जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला आणि ते त्याला दोथानात सापडले.
18त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला.
19ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे.
20तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्ड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले; मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते!”
21हे रऊबेनाच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातांतून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणाला, “आपण त्याला जिवे मारू नये.”
22रऊबेन त्यांना म्हणाला, “रक्तपात करू नका; तर ह्या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका.” त्यांच्या हातांतून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला.
23योसेफ आपल्या भावांजवळ पोहचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला,
24आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले; तो खड्डा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते.
25मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यांना दिसले.
26तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला, “आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपवला तर काय लाभ?
27चला, आपण त्याला ह्या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे.” हे त्याच्या भावांना पसंत पडले.
28ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.
29रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.
30तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, “मुलगा तर नाही; आता मी कोठे जाऊ?”
31मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला;
32आणि त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला; तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की, “हा आम्हांला सापडला; हा आपल्या मुलाचा झगा आहे काय ते ओळखा.”
33त्याने तो ओळखून म्हटले, “हा माझ्या मुलाचाच झगा! हिंस्र पशूने त्याला खाल्ले, योसेफाला फाडून टाकले ह्यात संशय नाही.”
34तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
35त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, “मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला.
36मिद्यानी लोकांनी योसेफाला मिसरात नेऊन पोटीफर नावाचा फारोचा एक अंमलदार गारद्यांचा सरदार होता, त्याला विकून टाकले.

Voafantina amin'izao fotoana izao:

उत्पत्ती 37: MARVBSI

Asongadina

Hizara

Dika mitovy

None

Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra