निर्गम 8
8
बेडकांची पीडा
1नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन त्याला सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
2पण तू त्यांना जाऊ देणार नाहीस, तर पाहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन;
3नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकरनोकरांच्या घरांत, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि काथवटींत बेडूकच बेडूक होतील;
4तुझ्या व तुझ्या लोकांच्या, आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगांवर बेडूक चढतील.”’ 5परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव ह्यांवर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर.”’ 6अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले, आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला.
7तेव्हा जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले, त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले.
8मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “परमेश्वराला विनवणी करा की, माझ्यापासून आणि माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावेत, म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी मी तुमच्या लोकांना जाऊ देईन.”
9मोशे फारोला म्हणाला, “तुझ्यापासून व तुझ्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावेत म्हणून मी तुझ्यासाठी, तुझ्या सेवकांसाठी आणि तुझ्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी, हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
10तो म्हणाला, “उद्या.” तेव्हा मोशेने म्हटले, “तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल, मग तुला कळेल की, आमचा देव परमेश्वर ह्याच्यासारखा दुसरा कोणी नाही.
11बेडूक तुझ्यापासून, तुझ्या घरातून, तुझ्या सेवकांपासून, तुझ्या प्रजेपासून दूर होतील; ते फक्त नदीत राहतील.”
12मोशे आणि अहरोन फारोकडून निघाले; आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्यासंबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला.
13परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; घरीदारी, गावात व शेतांत बेडूक होते, ते सर्व मरून गेले.
14लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली.
15ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना.
उवांची पीडा
16मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “अहरोनाला सांग की, ‘आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील.”’
17त्यांनी तसे केले; अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या; सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या.
18उवा उत्पन्न करण्यासाठी जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना; मनुष्य व पशू उवांनी भरून गेले.
19तेव्हा जादुगार फारोला म्हणाले, “ह्यात देवाचा हात आहे.” तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे ऐकेना.
गोमाश्यांची पीडा
20नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की, “पहाटेस ऊठ आणि जाऊन फारोपुढे उभा राहा; तो त्या वेळी नदीवर येईल; तू त्याला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यांना जाऊ दे.’
21माझ्या लोकांना जाऊ देणार नाहीस तर पाहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर, आणि तुझ्या घरात मी गोमाश्यांचे थवे पाठवीन; मिसरी लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाश्यांच्या थव्यांनी व्यापून जाईल.
22तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग ठेवीन; गोमाश्यांचे थवे तेथे जाणार नाहीत, ह्यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल.
23माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन; उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल.”’
24त्याप्रमाणे परमेश्वराने केले; फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरांत आणि सगळ्या मिसर देशात गोमाश्यांचे थव्यांचे थवे आले; गोमाश्यांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली.
25मग फारोने मोशे व अहरोन ह्यांना बोलावून आणून म्हटले, “तुम्ही जा, ह्याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा.”
26मोशे म्हणाला, “असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर ह्याला करणार आहोत त्याची मिसरी लोकांना किळस येईल. मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यांदेखत केल्यास ते आम्हांला दगडमार करायचे नाहीत काय?
27आम्ही रानात तीन दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू.”
28फारो म्हणाला, “तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव ह्याला यज्ञ करावा ह्यासाठी मी तुम्हांला जाऊ देतो; मात्र फार दूर जाऊ नका; माझ्यासाठी विनवणी करा.”
29मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की, फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावरील गोमाश्यांचे थवे उद्या निघून जावेत; मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यास लोकांना जाऊ न देण्यासंबंधी फारोने पुनरपि वंचना करू नये.”
30मग मोशेने फारोसमोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली.
31परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले; फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा ह्यांच्यावर आलेले गोमाश्यांचे थवे त्याने दूर केले; एकही गोमाशी राहिली नाही.
32तथापि फारोने ह्या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांना जाऊ दिले नाही.
Voafantina amin'izao fotoana izao:
निर्गम 8: MARVBSI
Asongadina
Hizara
Dika mitovy

Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.