Logo ya YouVersion
Elilingi ya Boluki

योहान 19

19
पिलात यहूद्यांपुढे दबून जातो
1नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले.
2शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरवले;
3आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या.
4तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, “पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.”
5ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”
6मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठायी अपराध दिसत नाही.”
7यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “आम्हांला नियमशास्त्र आहे; आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले.”
8पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला;
9आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही.
10पिलाताने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय?”
11येशूने उत्तर दिले, “आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता; म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे.”
12ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.”
13हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात.
14तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे सहावा तास होता. तेव्हा त्याने यहूद्यांना म्हटले, “पाहा, तुमचा राजा!”
15ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.”
16मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
येशूला वधस्तंभावर खिळणे
17मग त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले, आणि तो आपला वधस्तंभ स्वत: वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात.
18तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसर्‍याला दुसर्‍या बाजूस आणि येशूला मध्ये, असे वधस्तंभावर खिळले.
19पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिले होते.
20येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती.
21तेव्हा यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर ‘मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले,’ असे लिहा.”
22पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले.”
23शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एकेक वाटा असे चार वाटे केले; त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता.
24म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे;” हे ह्यासाठी झाले की,
“त्यांनी माझे कपडे आपसांत वाटून घेतले
आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या,”
असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले.
25येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्या उभ्या होत्या.
26मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!”
27मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
28ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले.
29तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.
30येशूने आंब घेतल्यानंतर, “पूर्ण झाले आहे,” असे म्हटले; आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
येशूच्या कुशीत भाला
31तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत (कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता), म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली.
32मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय मोडले;
33परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत.
34तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.
35ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.
36“त्याचे हाड मोडणार नाही” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या.
37शिवाय दुसर्‍याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की, “ज्याला त्यांनी विंधिले त्याच्याकडे ते पाहतील.”
येशूची उत्तरक्रिया
38त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने आपल्याला येशूचे शरीर घेऊन जाऊ द्यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा एक शिष्य असून यहूद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता; आणि पिलाताने परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन त्याचे शरीर नेले.
39आणि येशूकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे शंभर रत्तल मिश्रण घेऊन आला.
40त्यांनी येशूचे शरीर घेऊन यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्यांसहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले.
41त्याला वधस्तंभावर खिळले होते त्या ठिकाणी एक बाग असून तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवले नव्हते.
42तो यहूद्यांच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले, कारण ती कबर जवळ होती.

Currently Selected:

योहान 19: MARVBSI

Tya elembo

Kabola

Copy

None

Olingi kobomba makomi na yo wapi otye elembo na baapareyi na yo nyonso? Kota to mpe Komisa nkombo