Logo ya YouVersion
Elilingi ya Boluki

योहान 18

18
येशूला अटक
1हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला; तेथे बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.
2ही जागा त्याला धरून देणार्‍या यहूदालाही ठाऊक होती; कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे.
3तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परूशी ह्यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर यहूदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला.
4येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधता?”
5त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” येशू त्यांना म्हणाला, “मीच तो आहे.” त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्याबरोबर उभा होता.
6“मीच तो आहे” असे म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले.
7तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, “कोणाला शोधता?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”
8येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे असे मी तुम्हांला सांगितले; तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.”
9“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
10शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला; त्या दासाचे नाव मल्ख होते.
11येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल; पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”
12मग सैनिकांची तुकडी, हजारांचा सरदार व यहूद्यांचे कामदार ह्यांनी येशूला धरून बांधले.
13त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता.
14एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हे हितावह आहे अशी ह्याच कयफाने यहूद्यांना मसलत दिली होती.
पेत्र येशूला नाकारतो
15शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागेमागे चालले. तो शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात गेला;
16पण पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.
17ह्यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तूही त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस काय?” त्याने म्हटले, “मी नाही.”
18थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता.
19तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले.
20येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानांत व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही.
21मला का विचारता? ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा मी काय बोललो ते. पाहा, मी जे बोललो ते त्यांना ठाऊक आहे.”
22त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा असलेला एक कामदार येशूला चपराक मारून म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असा जबाब देतोस काय?”
23येशूने त्याला उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?”
24तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे बांधलेलेच पाठवले.
25शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता. त्याला इतर लोक म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” तो नाकारून बोलला, “मी नाही.”
26ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याजकाच्या दासांपैकी होता, तो त्याला म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”
27पेत्राने पुन्हा नाकारले; आणि लगेचच कोंबडा आरवला.
रोमी सुभेदार पिलात ह्याच्यापुढे येशू
28नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत.
29ह्यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर काय आरोप ठेवता?”
30त्यांनी त्याला उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन केले नसते.”
31पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला नेऊन तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”
32आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
33तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
34येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?”
35पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?”
36येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.”
37ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
38पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही.
39पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे; म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
40तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.

Currently Selected:

योहान 18: MARVBSI

Tya elembo

Kabola

Copy

None

Olingi kobomba makomi na yo wapi otye elembo na baapareyi na yo nyonso? Kota to mpe Komisa nkombo