मत्तय 7

7
इतरांचा न्याय करणे
1“इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. 2कारण ज्या पद्धतीने तुम्ही इतरांचा न्याय कराल, त्याच पद्धतीने तुमचाही न्याय करण्यात येईल, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल.
3“आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न आणता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? 4सर्व वेळ स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ असताना, ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणू शकतोस? 5अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल.
6“जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. जर टाकले तर ते कदाचित आपल्या पायाखाली तुडवतील आणि फाडून तुमचे तुकडे करतील.
मागा, शोधा, ठोका
7“मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल. 8कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल.
9“जर तुमच्या मुलाने भाकर मागितली, तर त्याला दगड देईल असा तुम्हामध्ये कोण आहे? 10किंवा मासा मागितला, तर साप देईल? 11जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील? 12तर मग जे सर्व इतरांनी तुमच्यासाठी करावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्हीही त्यांच्यासाठी करा. नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे सार हेच आहे.
अरुंद आणि रुंद दरवाजे
13“अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात. 14तरी जीवनाकडे नेणारा दरवाजा लहान असून मार्गही अरुंद आहे आणि अगदी थोडक्यांना तो सापडतो.
खरे आणि खोटे संदेष्टे
15“खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात. 16त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येते. लोक कधी काटेरी झुडपांवरून अंजीर किंवा रानगुलाबाच्या झुडपांवरून द्राक्षे काढतात काय? 17प्रत्येक चांगले झाड चांगले फळ देते आणि वाईट झाड वाईट फळ देते. 18चांगली झाडे वाईट फळे देणार नाहीत आणि वाईट झाडे चांगली फळे देणार नाही. 19या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील. 20अशाप्रकारे त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येईल.
खरे शिष्य आणि खोटे शिष्य
21“जो कोणी मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ म्हणत राहतो, तो प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल असे नाही, तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. 22त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील, ‘प्रभूजी, प्रभूजी आम्ही तुमच्या नावाने भविष्यवाणी केली नाही काय, तुमच्या नावाने भुते घालविली नाहीत काय, तुमच्या नावाने मोठे चमत्कार केले नाहीत काय?’ 23तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगेन, ‘मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो. अहो दुष्टांनो, माझ्यापासून दूर निघून जा.’
बांधकाम करणारे, एक शहाणा एक मूर्ख
24“यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले. 25पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. 26जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती आपल्या आचरणात आणत नाही, तो पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखा आहे. 27मग पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले आणि ते घर कोसळून पडले.”
28येशूंनी या गोष्टी सांगण्याचे संपविले, तेव्हा समुदाय त्यांच्या शिकवणीवरून थक्क झाले. 29कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.

선택된 구절:

मत्तय 7: MRCV

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요