योहान प्रस्तावना

प्रस्तावना
“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला शाश्वत जीवन प्राप्त व्हावे.” योहानरचित शुभवर्तमानातील हे विधान (3:16) संपूर्ण बायबलचा मतितार्थ व्यक्त करते.
प्रस्तुत शुभवर्तमानात योहान हे स्पष्ट करतो की, येशू हा परमेश्‍वराचा शाश्‍वत शब्द आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना शाश्वत जीवन मिळते, हे लोकांना कळावे हा सदर शुभवर्तमान लिहिण्यामागचा हेतू आहे (20:31).
येशूने केलेल्या चिन्हांचे स्पष्टीकरण ह्या शुभवर्तमानात ठिकठिकाणी आलेले आहे. येथे आपल्याला येशूवर श्रद्धा ठेवणारे व त्याचे अनुयायी होणारे लोक भेटतात, त्याचप्रमाणे त्याला विरोध करणारे व त्याच्यावर श्रद्धा ठेवायला तयार नसलेले लोकही आढळतात.
अध्याय 13-17 मध्ये आपल्या शिष्यांबरोबर असलेले येशूचे घनिष्ठ नाते व त्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याने केलेले मार्गदर्शन ह्यांचा सविस्तर वृत्तान्त आलेला आहे. येशूची अटक, त्याचा क्रुसावरील मृत्यू, त्याचे पुनरुत्थान व त्यानंतर त्याने शिष्यगणांना दिलेली दर्शने या घटनाक्रमांना अंतिम अध्यायात स्थान देण्यात आलेले आहे.
व्यभिचार करताना पकडलेल्या स्त्रीविषयीची हकीकत (8:1-11) कंसात छापलेली आहे कारण बऱ्याच प्राचीन हस्तलिखितांत व भाषांतरांत हा भाग वगळलेला आहे तर इतर अनुवादांत तो अन्यत्र सापडतो.
योहान त्याच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताद्वारे मिळणारे शाश्वत जीवन अधोरेखित करतो. सत्य व जीवन म्हणून येशूच्या मार्गाचा स्वीकार केल्यामुळे श्रद्धावंत माणसाला हे वरदान मिळते. प्रस्तुत शुभवर्तमानाचे लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे पाणी, भाकर, प्रकाश, मेंढपाळ, कळप, द्राक्षवेल आणि द्राक्षे अशा सर्वसामान्य गोष्टींचा येशूने केलेला प्रतीकात्मक उपयोग. त्यांच्या साहाय्याने येशू आध्यात्मिक सत्याची उकल कशी अप्रतिमपणे करून दाखवतो, हे योहानने बारकाईने टिपले आहे.
रूपरेषा
विषय प्रवेश 1:1-18
बाप्तिस्मा देणारा योहान व पहिले शिष्य 1:19-51
येशूचे सार्वजनिक कार्य 2:1-12:50
यरुशलेम परिसरातील अंतिम काळ 13:1-19:42
प्रभूचे पुनरुत्थान व दर्शने 20:1-31
समारोप:गालीलमधील आणखी एक दर्शन 21:1-25

하이라이트

공유

복사

None

모든 기기에 하이라이트를 저장하고 싶으신가요? 회원가입 혹은 로그인하세요