मत्तय 13
13
पेरणाऱ्याचा दाखला
1त्याच दिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या काठावर जाऊन बसला. 2लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ इतकी गर्दी करू लागल्या की, तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक काठावर उभे राहिले. 3त्याने त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकविल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करायला निघाला. 4तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले व पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले. 5काही खडकाळ जमिनीवर पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. 6परंतु सूर्य वर आला तेव्हा ते करपले आणि मुळे नसल्यामुळे वाळून गेले. 7काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. ती झुडुपे वाढल्याने ते गुदमरून गेले. 8काही सुपीक जमिनीत पडले. त्याला शंभरपट, साठपट, तर तीसपट असे पीक आले. 9ज्याला ऐकण्यासाठी कान असतील त्याने ऐकावे!”
दाखल्यांचा उपयोग
10तेव्हा शिष्यांनी जवळ येऊन त्याला विचारले, “आपण लोकांना उपदेश करताना दाखले का देता?” 11त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे ज्ञान तुम्हांला दिलेले आहे परंतु त्यांना ते ज्ञान दिलेले नाही. 12कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल व त्याची भरभराट होईल; परंतु ज्या कोणाजवळ काहीच नाही त्याचे थोडेफार जे असेल तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल. 13ते बघतात पण त्यांना दिसत नाही; ते ऐकतात पण त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांना समजतही नाही. म्हणून त्यांना प्रबोधन करताना मी दाखले देतो. 14यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे. तो असा, “तुम्ही ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही, तुम्ही पाहाल पण तुम्हांला कळणार नाही’,
15ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. नाही तर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील, कानांनी ऐकतील, त्यांच्या अंतःकरणांना समजेल, ते माझ्याकडे वळतील व मी त्यांना बरे करीन.
16परंतु धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत आणि धन्य तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. 17मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुम्ही जे पाहात आहात ते पाहायला पुष्कळ संदेष्टे व नीतिमान उत्कंठित झाले होते तरीसुद्धा त्यांना ते पाहायला मिळाले नाही आणि तुम्ही जे ऐकत आहात ते ऐकायला ते उत्कंठित झाले होते पण त्यांना ते ऐकायला मिळाले नाही.
पेरणाऱ्याच्या दाखल्याचे स्पष्टीकरण
18तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. 19जो स्वर्गाच्या राज्याचे वचन ऐकतो पण त्याला ते समजत नाही तो वाटेवर पडलेल्या बीप्रमाणे आहे. त्याच्या अंतःकरणात जे पेरले होते ते सैतान येऊन हिरावून घेतो. 20जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. 21परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो. 22जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे. 23जो वचन ऐकून ते समजून घेतो, तो चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. त्याचे पीक मिळते - कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर अन्यत्र तीसपट.”
निदणाचा दाखला
24त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. 25परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला. 26जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले. 27तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’ 28तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’ 29परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल. 30कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, प्रथम निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि नंतर गहू गोळा करून माझ्या कोठारात साठवा.’”
मोहरीच्या दाण्याचा दाखला
31येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला. 32तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.”
खमिराचा दाखला
33येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.”
34दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. 35‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले.
निदणाच्या दाखल्याचे स्पष्टीकरण
36लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.”
37त्याने उत्तर दिले, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. 38शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत. 39निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत. 40जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल. 41मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून 42अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल. 43त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!
खजिन्याचा दाखला
44स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. तो एका मनुष्याला सापडतो. तो मनुष्य खजिना पुन्हा लपवून ठेवतो. नंतर तो आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो.
मोत्याचा दाखला
45तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. 46त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.
जाळ्याचा दाखला
47स्वर्गाचे राज्य हे सरोवरात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. त्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र पकडले जातात. 48जाळे भरल्यावर कोळी लोक ते काठावर ओढतात आणि चांगले मासे भांड्यांत जमा करतात, पण खराब ते फेकून देतात. 49तसे युगाच्या शेवटी होईल, देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील व 50त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल.
51तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.”
52तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.”
नासरेथ गावी येशूचा अव्हेर
53हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला. 54स्वतःच्या गावी आल्यावर त्याने तेथील लोकांना सभास्थानात अशी शिकवण दिली की, ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून प्राप्त झाले? 55हा सुताराचा मुलगा ना? मरिया ह्याची आई ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना? 56ह्याच्या सर्व बहिणी येथेच राहतात ना? मग हे सर्व ह्याला कोठून मिळाले?” 57आणि त्यांनी येशूचा अव्हेर केला. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला त्याच्या देशात व स्वतःच्या घरी सन्मान मिळत नाही.” 58तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत.
Attualmente Selezionati:
मत्तय 13: MACLBSI
Evidenziazioni
Condividi
Copia
Vuoi avere le tue evidenziazioni salvate su tutti i tuoi dispositivi?Iscriviti o accedi
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.