Akara Njirimara YouVersion
Akara Eji Eme Ọchịchọ

लूक 13

13
पश्‍चात्ताप करण्याविषयी बोध
1त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला, ज्या गालीलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञांत मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले.
2मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय?
3मी तुम्हांला सांगतो, नव्हते; तरीपण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.”
4किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणार्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय?
5मी तुम्हांला सांगतो, नव्हते; पण जर तुम्ही पश्‍चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल.”
अंजिराच्या निष्फळ झाडाचा दृष्टान्त
6त्याने हा दाखला सांगितला, “कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते; त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही.
7तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे; परंतु मला काही आढळत नाही; ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’
8तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन.
9मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’
शब्बाथ दिवशी रोगमुक्त झालेली स्त्री
10तो शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता.
11तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.
12येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”
13त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
14येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यांत काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत; तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.”
15परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना?
16ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?”
17तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजीत झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा दृष्टान्त
18ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ?
19ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले; आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यांत राहू लागली.”
20तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ?
21ते खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.”
तारणप्राप्तीचे अरुंद प्रवेशद्वार
22तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत देत यरुशलेमेकडे चालला.
23तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?”
24तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.
25घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’
26तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’
27परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्‍यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’
28तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल.
29पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील.
30आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.”
हेरोदाचे वैर
31त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.”
32त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्‍या दिवशी मी परिपूर्ण होईन.
33तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’
यरुशलेमेची स्थिती पाहून केलेला विलाप
34यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
35पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”

Nke Ahọpụtara Ugbu A:

लूक 13: MARVBSI

Mee ka ọ bụrụ isi

Kesaa

Mapịa

None

Ịchọrọ ka echekwaara gị ihe ndị gasị ị mere ka ha pụta ìhè ná ngwaọrụ gị niile? Debanye aha gị ma ọ bụ mee mbanye