मत्तय 9
9
येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतात
1येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले. 2काही लोकांनी पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती माणसाला म्हणाले, “मुला, धीर धर तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
3मग तेथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!”
4त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही दुष्टाईने भरलेले विचार तुमच्या मनामध्ये का करता? 5यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ 6तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपली बाज उचल आणि घरी जा.” 7तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला. 8प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाच्या मनात भीती वाटली व ज्या परमेश्वराने मनुष्यास असा अधिकार दिला त्यांची सर्वांनी स्तुती केली.
मत्तयाला पाचारण
9मग येशू तेथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.
10नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. 11ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?”
12हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. 13ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’#9:13 होशे 6:6 पण दया पाहिजे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलवायला आलो आहे.”
येशूंना उपासाविषयी प्रश्न विचारण्यात येतात
14एके दिवशी बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, “गुरुजी, आम्ही आणि परूशी लोक उपास करतो तसे तुमचे शिष्य का करत नाहीत?”
15तेव्हा येशू म्हणाले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.
16“नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावीत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल. 17त्याचप्रमाणे कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात आणि दोन्ही सुरक्षित राहतात.”
एक मृत मुलगी व एक रक्तस्रावी स्त्री
18हे बोलत आहे तोच, सभागृहाचा पुढारी आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल!” 19येशू उठून त्याच्याबरोबर गेले आणि त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबर निघाले.
20तेव्हा जिला बारा वर्षे रक्तस्त्राव होत होता अशी एक स्त्री त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला. 21कारण तिने आपल्या मनात म्हटले की, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.”
22येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणाला ती स्त्री बरी झाली.
23येशू त्या सभागृह पुढार्याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तेथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते. 24ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले. 25शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तेथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली. 26याविषयीची बातमी त्या सर्व प्रदेशात पसरली.
येशू दोन आंधळ्यास व एक मुक्याला बरे करतात
27येशू तेथून पुढे निघाल्यावर, दोन आंधळे त्यांच्यामागे आले व मोठ्याने म्हणाले, “अहो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.”
28जेव्हा ते घरात गेले त्यावेळी ते आंधळे त्यांच्याकडे आले आणि येशूंनी त्यांना विचारले, “मी हे करण्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय?”
“होय प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
29मग येशूंनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, “तुमच्या विश्वासानुसार तुम्हासाठी केले जावो.” 30आणि त्याच क्षणाला त्यांना दिसू लागले. येशूंनी त्यांना सक्त ताकीद दिली, “याविषयी कोणालाही काहीही सांगू नका,” 31परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली.
32ते बाहेर जात असताना, एका भूतग्रस्त मनुष्याला, जो मुका होता, त्याला येशूंकडे आणण्यात आले. 33येशूंनी त्या भुताला त्याच्यामधून हाकलून लावले, तेव्हा त्या मुक्या माणसाला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “असला अद्भुत प्रकार इस्राएलात आम्ही कधीच पाहिला नव्हता.”
34परंतु परूशी लोक म्हणाले, “भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने तो भुते घालवितो.”
कामकरी थोडे आहेत
35येशूंनी त्या भागातील सर्व शहरांत व खेड्यापाड्यांत प्रवास करून, परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा करत व प्रत्येक प्रकारचा रोग आणि प्रत्येक प्रकारचा विकार बरा करीत सभागृहामध्ये शिक्षण देत फिरले. 36त्यांनी समूहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. 37-38ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभुने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.”
Pilihan Saat Ini:
मत्तय 9: MRCV
Sorotan
Berbagi
Salin
Ingin menyimpan sorotan di semua perangkat Anda? Daftar atau masuk
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.