मत्तय 4

4
अरण्यात येशूची परीक्षा
1सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने येशूला अरण्यात नेले. 2तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली. 3सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”
4परंतु त्याने उत्तर दिले, “असे लिहिले आहे, “मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगतो.’”
5नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले 6आणि त्याला म्हटले, ‘तू देवाचा पुत्र असशील तर खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे, “तो त्याच्या दूतांना तुझ्याविषयी आदेश देईल आणि तुझे पाय धोंड्यांवर आपटू नयेत म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.’”
7येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’”
8पुन्हा सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातील सर्व राज्ये त्यांच्या वैभवासह त्याला दाखवली 9आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून माझी आराधना करशील, तर मी हे सर्व तुला देईन.”
10येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असे लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्‍वर ह्याची तू आराधना कर व केवळ त्याचीच सेवा कर.’”
11नंतर सैतान येशूला सोडून गेला आणि पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.
येशूच्या जीवनकार्याची सुरुवात
12योहानला अटक झाली आहे, हे ऐकून येशू गालीलमध्ये निघून गेला 13आणि नासरेथ सोडून जबलून व नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला. 14हे अशासाठी झाले की, यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे:
15जबलून प्रांत व नफताली प्रांत,
समुद्रकिनाऱ्यावरचा, यार्देनच्या
पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील!
16अंधकारात बसलेल्यांनी महान प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत वस्ती करणाऱ्या लोकांवर प्रकाश उदय पावला आहे.
17तेव्हापासून येशू त्याच्या संदेशाची घोषणा करू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”
पहिल्या शिष्यांना पाचारण
18येशू गालील समुद्राजवळून चालला असताना त्याने पेत्र ऊर्फ शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात जाळे टाकताना पाहिले. कारण ते कोळी होते. 19त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 20ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले.
21तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना त्यांच्या वडिलांबरोबर तारवात त्यांची जाळी नीट करताना पाहिले. येशूने त्यांनाही बोलावले. 22त्यांच्या वडिलांना तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले.
गालीलमधील सेवाकार्य
23येशू यहुदी लोकांच्या सभास्थानांत प्रबोधन करीत, राज्याचे शुभवर्तमान जाहीर करत गालीलभर फिरला आणि त्याने लोकांचे सर्व प्रकारचे रोग व आजार बरे केले. 24त्याची कीर्ती सर्व सूरियात पसरली. नाना प्रकारचे आजार व व्यथा असलेल्या रोग्यांना, तसेच भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती माणसांना त्याच्याकडे आणण्यात आले आणि त्याने त्यांना बरे केले. 25गालील, दकापलीस, यरुशलेम, यहुदिया व यार्देनच्या पलीकडचा प्रदेश ह्यांतून लोकांच्या झुंडी त्याच्यामागे जाऊ लागल्या.

Sorotan

Berbagi

Salin

None

Ingin menyimpan sorotan di semua perangkat Anda? Daftar atau masuk