मत्तय 9
9
पक्षाघाती मनुष्य
1येशू तारवात बसून सरोवराच्या पलीकडे गेला व आपल्या नगराला जाऊन पोहोचला. 2त्याच वेळी तेथे खाटेवर पडून असलेल्या एका पक्षाघाती माणसाला काही लोकांनी त्याच्याकडे आणले. येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर, तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे.”
3त्या वेळी कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करीत आहे.”
4येशू त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का आणता? 5कारण ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’, असे म्हणणे, ह्यांतील अधिक सोपे कोणते? 6पण मनुष्याच्या पुत्राला पापांची क्षमा करायचा अधिकार पृथ्वीवर आहे, हे तुम्हांला समजावे.” मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला, “ऊठ, तुझी खाट उचलून घे व तुझ्या घरी जा.”
7तेव्हा तो उठून त्याच्या घरी गेला. 8हे पाहून लोक भयभीत झाले आणि माणसांना एवढा अधिकार देणाऱ्या देवाचा त्यांनी गौरव केला.
मत्तयला पाचारण
9तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकात नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तो उठून त्याच्यामागे गेला.
10एकदा मत्तयच्या घरात येशू जेवायला बसला असता बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले होते. 11हे पाहून परुशी येशूच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू अशा जकातदार व पापी लोकांबरोबर का जेवतो?”
12परंतु हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर आजाऱ्यांना असते. 13‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.”
14त्या वेळी योहानचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले, “आम्ही व परुशी उपवास करतो परंतु आपले शिष्य उपवास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”
15येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना शोक करणे कसे शक्य आहे? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपवास करतील.
16नवीन कापडाचे ठिगळ कोणी जुन्या वस्त्राला लावत नाही; कारण नीट करण्याकरता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते. 17तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत भरत नाही. भरला तर बुधले फुटून द्राक्षारस वाया जातो आणि बुधले निकामी होतात. म्हणून नवा द्राक्षारस नव्या बुधल्यांत भरतात म्हणजे दोन्ही टिकतात.”
अधिकाऱ्याची कन्या व रक्तस्रावी स्त्री
18तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, एक यहुदी अधिकारी येऊन त्याला नमन करून म्हणाला, “माझी मुलगी आताच मरण पावली आहे. तरी आपण येऊन तिच्यावर आपले हात ठेवावेत म्हणजे ती जिवंत होईल.” 19येशू उठला व आपल्या शिष्यांसह त्याच्यामागे निघाला.
20तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने पीडलेली एक स्त्री त्याच्यामागून आली व तिने त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला. 21ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तरी मी बरी होईन.”
22येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली.
23नंतर येशू त्या अधिकाऱ्याच्या घरी गेला तेव्हा अंत्यविधीसाठी आलेल्या पावा वाजवणाऱ्यांना व गलबला करणाऱ्या लोकांना पाहून येशू म्हणाला, 24“वाट सोडा, मुलगी मेली नाही, ती झोपली आहे.” ते त्याला हसू लागले. 25परंतु त्यांना बाजूला सारून आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले, तेव्हा ती उठली! 26हे वर्तमान त्या विभागात सर्वत्र पसरले.
दोन आंधळे
27येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे आले आणि ओरडत विनवू लागले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”
28तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. येशूने त्यांना विचारले, “हे करायला मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभो.”
29त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो” 30आणि त्यांना दिसू लागले. येशूने त्यांना निक्षून सांगितले, “पाहा, हे कोणाला सांगू नका.”
31परंतु ते तेथून निघून गेल्यावर त्यांनी त्याच्याविषयीचे वृत्त त्या विभागात सर्वत्र पसरवले.
मुका भूतग्रस्त
32ते निघून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणण्यात आले. 33त्याचे भूत काढल्यावर मुका बोलू लागला, तेव्हा लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलमध्ये असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
34परंतु परुशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
लोकांचा कळवळा
35येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, स्वर्गाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करत आणि सर्व रोग व दुखणी बरी करत नगरांतून व गावांतून फिरत होता. 36लोकसमुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक गांजलेले व पांगलेले होते. 37नंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत, 38म्हणून पिकाच्या धन्याने कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत ह्याकरिता त्याच्याकडे प्रार्थना करा.”
Արդեն Ընտրված.
मत्तय 9: MACLBSI
Ընդգծել
Կիսվել
Պատճենել
Ցանկանու՞մ եք պահպանել ձեր նշումները ձեր բոլոր սարքերում: Գրանցվեք կամ մուտք գործեք
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.