YouVersion logo
Ikona pretraživanja

लूक 20

20
येशूच्या अधिकाराविषयी संशय
मत्त. 21:23-27; मार्क 11:27-33
1एके दिवशी येशू परमेश्वराच्या भवनात लोकांस शिक्षण देत असता व सुवार्ता सांगत असता, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले. 2ते त्यास म्हणाले, “कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस हे आम्हास सांग, तुला हा अधिकार कोणी दिला?” 3तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीसुद्धा तुम्हास एक प्रश्न विचारतो, तुम्ही मला सांगा. 4योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून होता?” 5त्यांनी आपसात चर्चा केली आणि एकमेकांना म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 6पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणास दगडमार करतील कारण त्यांची खात्री आहे की, योहान हा एक संदेष्टा होता.” 7म्हणून, “तो कोणापासून होता हे आम्हास माहीत नाही.” असे त्यांनी त्यास उत्तर दिले. 8मग येशू त्यास म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे मीसुद्धा तुम्हास सांगणार नाही.”
द्राक्षमळ्याचा दृष्टांत
मत्त. 21:33-46; मार्क 12:1-12
9मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला. 10हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले. 11नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले. 12तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले. पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले. 13द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करू? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्यास मान देतील.’ 14पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’ 15त्यांनी त्यास द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील? 16तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.” त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.”
17येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले,
“तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला.
18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”
कर देण्याबाबत प्रश्न
19नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक लोक यांनी त्याचवेळी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांना त्यास अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. 20तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले. 21म्हणून त्या हेरांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता. 22आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?” 23ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. म्हणून तो त्यांना म्हणाला, “मला एक नाणे दाखवा. 24यावर कोणाची प्रतिमा व लेख आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” 25तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.” 26तेव्हा लोकांसमोर तो जे काही बोलला त्यामध्ये त्यास धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि निरुत्तर झाले.
पुनरुत्थानविषयक प्रश्न
मत्त. 22:23-33; मार्क 12:18-27
27मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, 28“गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत. 29सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला. 30नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. 31नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. 32नंतर ती स्त्रीही मरण पावली. 33तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.” 34तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. 35परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत 36आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. 37जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वरास ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असे म्हणले व मरण पावलेलेसुद्धा उठवले जातात हे दाखवून दिले. 38देव मरण पावलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.” 39तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात.” 40मग त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे काय?
मत्त. 22:41-46; मार्क 12:35-37
41परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात? 42कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो,
‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले,
43 मी तुझ्या शत्रूला तुझ्या पादासन करीत नाही तोपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बस,’
44 अशा रीतिने दावीद त्यास प्रभू म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?”
शास्त्रासंबधाने दिलेला इशारा
मत्त. 23:1-7; मार्क 12:38-40
45सर्व लोक हे ऐकत असतांना तो शिष्यांना म्हणाला, 46“नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. 47ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या मनुष्यांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”

Trenutno odabrano:

लूक 20: IRVMar

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li svoje istaknute stihove spremiti na sve svoje uređaje? Prijavi se ili registriraj

Videozapis za लूक 20