Logo YouVersion
Îcone de recherche

योहान 6

6
येशू पाच हजारांना जेवू घालतात
1काही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्‍यास सरोवर) असेही म्हणत 2लोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्‍यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते. 3यानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले. 4यहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता.
5जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?” 6ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते.
7फिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक#6:7 ग्रीकमध्ये चांदीचे दोनशे दिनार तरी लागेल!”
8मग शिमोन पेत्र जो येशूंचा शिष्य होता, त्याचा भाऊ आंद्रिया म्हणाला, 9“येथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच लहान भाकरी आणि दोन लहान मासे आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना कशा काय पुरतील?”
10येशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत होते व ते खाली बसले. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती. 11मग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले.
12सर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.” 13मग त्यांनी उरलेले तुकडे गोळा केले आणि जवाच्या पाच भाकरींपैकी जेवून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या.
14येशूंनी हे चिन्ह केल्याचे पाहून लोक म्हणू लागले, “खरोखर, या जगात जो येणार होता तो संदेष्टा हाच आहे.” 15लोक आपल्याला जबरदस्तीने राजा करण्याच्या उद्देशाने आले आहेत हे येशूंना माहीत होते, तेव्हा ते पुन्हा एकटेच डोंगरावर निघून गेले.
येशू पाण्यावर चालतात
16संध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले, 17ते होडीत बसून सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यपि त्यांच्याकडे परतले नव्हते. 18परंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या. 19ते तीन किंवा चार मैल#6:19 किंवा पाच ते सहा किलोमीटर अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले. 20परंतु ते त्यांना म्हणाले, “मीच आहे; भिऊ नका.” 21ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्‍यास पोहोचली.
22मग दुसर्‍या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्‍यावर लोकांचा समुदाय थांबला होता, तिथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहित त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते. 23काही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभूने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्या ठिकाणी आल्या. 24समुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
जीवनाची भाकर
25ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?”
26येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात. 27नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”
28त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?”
29येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल? 31आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’#6:31 निर्ग 16:4; नहे 9:15; स्तोत्र 78:24, 25
32येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे. 33ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
34ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”
35त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. 36परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. 37जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही. 38कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे. 39आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे. 40कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”
41मी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले. 42ते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?”
43हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका, 44ज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. 45संदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’#6:45 यश 54:13 जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो. 46जो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही. 47मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे. 48मीच जीवनाची भाकर आहे. 49तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले. 50परंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही. 51मी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”
52यास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?”
53येशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही. 54जो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन. 55कारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे. 56जे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो. 57मला पाठविणार्‍या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल. 58मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.” 59येशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले.
अनेक शिष्य येशूंना सोडून जातात
60हे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?”
61त्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का? 62तर मग मानवपुत्राला, जिथे ते पूर्वी होते तिथे वर चढून जाताना पाहाल! 63फक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत. 64तरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते. 65पुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.”
66हे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत.
67येशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?”
68त्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत. 69आम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.”
70येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!” 71हे शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदाह याच्यासंबंधात ते बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून त्यांचा विश्वासघात करणार होता.

Sélection en cours:

योहान 6: MRCV

Surbrillance

Partager

Copier

None

Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi

Plans de lecture et méditations gratuites relatifs àयोहान 6

YouVersion utilise des cookies pour personnaliser votre expérience. En utilisant notre site Web, vous acceptez l'utilisation des cookies comme décrit dans notre Politique de confidentialité