लूक 16
16
अन्यायी कारभार्याचे शहाणपण
1मग त्याने शिष्यांनाही म्हटले, “एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता; त्याच्यावर, हा तुमची संपत्ती उडवतो, असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला.
2तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे; कारण ह्यापुढे तुला कारभार पाहायचा नाही.’
3मग कारभार्याने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही; भीक मागण्याची लाज वाटते.
4तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.’
5मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकर्यास बोलावले आणि पहिल्याला म्हटले, ‘माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे?’
6तो म्हणाला, ‘शंभर मण तेल.’ त्याने त्याला म्हटले, ‘हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर पन्नास मांड.’
7नंतर दुसर्याला म्हटले, ‘तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंड्या गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व ऐंशी मांड.’
8अन्यायी कारभार्याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
9आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे.
10जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.
11म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल?
12आणि जे दुसर्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल?
13कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.”
येशू परूश्यांचा निषेध करतो
14धनलोभी परूशी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते.
15त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.
16योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते; तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करतो.
17नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे.
18जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.
श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर
19कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.
20त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता;
21त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत.
22पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली.
23तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.
24तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’
25अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.
26एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.’
27मग तो म्हणाला, ‘तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव;
28कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’
29पण अब्राहामाने त्याला म्हटले, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
30तो म्हणाला, ‘हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’
31तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’
Sélection en cours:
लूक 16: MARVBSI
Surbrillance
Partager
Copier
Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.